लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 09:28 AM2017-09-16T09:28:01+5:302017-09-16T11:31:38+5:30
लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.
लंडन, दि. 16 - लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत 29 प्रवासी जखमी झाले. लंडन स्टेशनजवळील भुयारीमार्गातून जाणा-या एक भरगच्च ट्रेनमध्ये स्फोट घडवण्यात आला. यासाठी आयईडी स्फोटकांचा वापर करण्यात आला. यावर्षातील ब्रिटनमध्ये झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे.
हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले.
पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली.