बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:20 AM2018-12-23T05:20:17+5:302018-12-23T05:21:30+5:30
घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे.
वॉशिंग्टन : घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, नाताळाच्या सुटीनंतर अमेरिकेचे निम्म्याहून अधिक प्रशासन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जेरेड आणि व्हाईट हाऊसचे बजेट प्रमुख माईक मुलवेनी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी शुक्रवारी झालेल्या वाटाघाटींतून तोडगा निघाला नाही. नाताळाच्या सुटीत काँग्रेसचे अधिवेशन भरून विनियोजन विधेयक मंजूर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुलवेनी यांनी खातेप्रमुखांना शिस्तबद्ध पद्धतीने काम बंद करण्याची तयारी ठेवण्याचे कळविले आहे. काँग्रेसमध्ये हा तिढा फार काळ ताणला जाणार नाही, हे स्पष्ट आहे.
कर्मचाऱ्यांना घरी बसवणार?
विनियोजन विधेयक वर्ष संपण्यापूर्वी मंजूर न झाल्यास संघीय सरकारमधील १५ पैकी नऊ खात्यांचे व अनेक संघीय सेवांचे कामकाज ठप्प होईल. याचा परिणाम संघीय सरकारच्या आठ लाख कर्मचाºयांवर होईल. यापैकी ४.२० लाख कर्मचारी अत्यावश्यक सेवांचे असल्याने ते पगार न मिळताही काम सुरू ठेवतील. बाकीच्या ३.८० लाख कर्मचाºयांना घरी बसविले जाईल. जेव्हा अर्थसंकल्प मंजूर होईल तेव्हा कर्मचाºयांना या काळाचा पगार दिला जाईल. (वृत्तसंस्था)