जगात सर्वसमावेशक अन्नव्यवस्था उभी करा; जी-७ देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 09:12 AM2023-05-21T09:12:29+5:302023-05-21T09:12:50+5:30
विस्तारवादी मानसिकतेवरही टीक, जपानमधील हिरोशिमा येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेत मोदी बोलत होते.
हिरोशिमा : जगातील दुर्बल लोकांवर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक अन्नव्यवस्था उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. खतांच्या संपदेवर ताबा ठेवून असलेली 'विस्तारवादी मानसिकता' संपविण्याची गरज असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
जपानमधील हिरोशिमा येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेत मोदी बोलत होते. त्यांनी सांगितले की, दुर्बल लोक, विशेषतः वंचित शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन सर्वसमावेशक अन्नव्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक खत पुरवठा साखळी मजबूत व्हायला हवी. या मार्गातील राजकीय अडथळे दूर व्हायला हवे. खत संपदा ताब्यात ठेवून असलेल्या विस्तारवादी मानसिकता संपविण्याची गरज आहे. आपल्या सहकार्याचा हाच हेतू असायला हवा. हे वक्तव्य करताना पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. जी-७ आणि जी-२० देशांना जोडण्याची आवश्यकता असल्याचेही मोदी यांनी सांगितले. जी-७ समूहात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटाली, जर्मनी, कॅनडा आणि जपान या श्रीमंत लोकशाही राष्ट्रांचा समावेश आहे. जी-७ चा अध्यक्ष या नात्याने जपानने भारताला शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. (वृत्तसंस्था)
बायडेन यांनी चालत येऊन दिले मोदी यांना आलिंगन
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे बैठकीला पोहोचताच त्यांना पंतप्रधान मोदी दिसले, ते चालत मोदींकडे गेले आणि त्यांना आलिंगन दिले. मोदी यांनीही त्यांना उत्साहात आलिंगन दिले.
अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची चर्चा
याप्रसंगी मोदी यांनी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ब्रिटिश पंतप्रधान ऋषि सुनक, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज, व्हीएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह, इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो आणि संयुक् राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ ग्युटेरस यांचा त्यात समावेश आहे. या देशांसोबत भारताने संरक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक व व्यवसाय या क्षेत्रात द्वीपक्षीय सहकार्य वाढविण्याचे मान्य केले.
युक्रेन- रशिया युद्धानंतर मोदी व झेलेन्स्कींची प्रथमच भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर दोन्ही नेत्यांची यानिमित्त पहिल्यांदाच आमने-सामने भेट झाली.
महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
हिरोशिमा येथे महात्मा गांधी यांच्या अर्ध पुतळ्याचे मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १९४५ साली अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता. या पार्श्वभूमीवर शांतता व अहिंसेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी येथे गांधी पुतळा उभारण्यात आला आहे. जग आजही हिरोशिमा शब्द ऐकून घाबरून जाते, असे मोदी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
'युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर आणावा दबाव'
युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दबाव आणावा अशी सूचना जी-७ गटातील देशांनी केली आहे. यासंदर्भात या देशांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, चीनचे नुकसान करण्याची आम्हाला इच्छा नाही. त्या देशाशी आम्हाला रचनात्मक संबंध हवे आहेत.
चीनच्या पूर्व व दक्षिण बाजूच्या समुद्रात त्या देशाने आपले लष्करी वर्चस्व निर्माण करण्याचा पयल चालविला आहे.
तसेच तैवानचा ताबा घेण्यासाठीही हालचाली सुरू केल्या असून ही चिंताजनक बाब आहे. चीनने या हालचाली थांबवाव्यात असे जी-७ गटाच्या देशांनी म्हटले आहे.
बैठकीतून चीनला इशारा
इंडो-पॅसिफिकचा प्रदेश सर्वांसाठी मुक्त असावा, तिथे कोणीही वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे क्वाड गटाच्या सदस्य देशांनी म्हटले आहे. नाव न घेता क्वाड गटाच्या सदस्यांनी चीनला हा इशारा दिला आहे. कोणत्याही समस्येवर युद्ध हा उपाय नाही. कोणत्याही प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढता येणे शक्य आहे, असे मत वचाड देशांनी युक्रेन युद्धाबाबत व्यक्त केले. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे चार देश क्वाड गटाचे सदस्य आहेत. बायडेन यांनी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केल्यामुळे जी - ७ देशांच्या परिषदेच्या दरम्यानच ही बैठक शनिवारी पार पडली.