ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार
By admin | Published: September 13, 2016 06:03 AM2016-09-13T06:03:25+5:302016-09-13T06:03:25+5:30
भव्यदिव्य आणि चीन हे समीकरणच बनले आहे. मोठा भूप्रदेश, मोठी लोकसंख्या, मोठे लष्कर, मोठी भिंत असे सर्व काही मोठे असलेल्या चीनचे बांधकाम प्रकल्पही भव्यदिव्य असतात
बीजिंग : भव्यदिव्य आणि चीन हे समीकरणच बनले आहे. मोठा भूप्रदेश, मोठी लोकसंख्या, मोठे लष्कर, मोठी भिंत असे सर्व काही मोठे असलेल्या चीनचे बांधकाम प्रकल्पही भव्यदिव्य असतात. मग ते इमारतींचे असतील अथवा पुलाचे. चिनी अभियंत्यांनी अलीकडेच जगातील सर्वात उंच पुलाचे बांधकाम पूर्ण केले असून, हा पूल लवकरच जनतेसाठी खुला केला जाणार आहे.
डोंगराळ भागात नदीवर बांधलेल्या या पुलाचे नाव बेईपांजियांग आहे. त्याची दोन टोके जोडण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. गुझ्झू प्रांताच्या खोऱ्यातील या पुलाची उंची ५६५ मीटर (तब्बल १८५४ फूट) म्हणजेच २०० मजली इमारतीएवढी असून, तो जगातील सर्वात उंच पूल आहे, असे गुझ्झू परिवहन मंत्रालयाचे अधिकारी वू दाहोंग यांनी सांगितले. १३४१ मीटर लांबीचा बेईपांजियांग पूल येत्या तीन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. बेईपांजियांगने हुबेई प्रांतातील सी दू नदीवरील पुलाला मागे टाकून जगातील सर्वात उंच पूल बनण्याचा मान मिळविला आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
झेझियांग प्रांताच्या हांगझू शहराचा महामार्ग आणि गुझ्झू प्रांतातील रुली शहराला जोडणाऱ्या या पुलाचे काम २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते.पूल उभारणीवर एक अब्ज येन अर्थात १५ कोटी डॉलर एवढा खर्च झाला आहे. चीनमध्ये अनेक उंच पूल आहेत. तथापि, स्वत:च्या बांधणीची (स्ट्रक्टर) उंची विचारात घेतल्यास सर्वाधिक उंचीचा पूल असण्याचा मान आजही फ्रान्समधील मिलाऊ व्हायदक्त या पुलाकडे आहे. त्याची उंची ३४३ मीटर (११२५ फूट) आहे.