ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:02 AM2019-01-27T04:02:08+5:302019-01-27T06:41:33+5:30

शोधकार्य सुरू; नऊ जणांचे मृतदेह सापडले

The bund was broken in Brazil; 300 people are afraid of blown | ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती

ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती

ब्रमादिन्हो : आग्नेय ब्राझीलमधील एका खाणीतील बंधारा फुटून ३०० जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नऊ जणांचे मृतदेह सापडले असून कुणी जिवंत असण्याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मिनास गेराईस राज्यातील ब्रमादिन्हो आणि बेलो हॉरिझोन्टी शहराजवळील या बंधाऱ्याचा वापर कोणत्याही कामासाठी केला जात नव्हता. तो फुटल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल पसरला आहे. लोह खनिज खाणीत असलेला बंधारा फुटल्यानंतर युद्धस्तरावर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सात जणांचे मृतदेह आढळून आले.

स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी यापूर्वी बेपत्ता असणाºयांची संख्या १५० असल्याचे म्हटले होते. शनिवारी मात्र ही संख्या दुप्पट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फुटलेल्या बंधाऱ्याजवळच एका कंपनीचे प्रशासकीय कार्यालय असून तेथे काम करणाऱ्या १५० जणांचा बेपत्ता लोकांमध्ये समावेश आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक अशी ही घटना मानली जाते. ब्राझीलचे खाणसम्राट व्हाले यांच्या मालकीची ही खाण असून यापूर्वी २०१५ मध्ये खाणीचा काही भाग कोसळून १९ जण ठार झाले होते.

या दुर्घटनेनंतर व्हाले या कंपनीचे न्यूयॉर्क बाजारातील शेअर्स गडगडले आहेत. जीवितांच्या मदतीसाठी सर्वोतोपरी मदत केली जात आहे, आता कुणी जिवंत असण्याची शक्यता कमी झाली असून मृतदेहच हाती लागू शकतात, असे मिनास गेराईसचे गव्हर्नर रोेमेयू झेमा यांनी स्पष्ट केले. खाणीतील बंधारा फुटला त्यावेळी खाणीत ४२७ लोक काम करीत होते. २७९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून उर्वरित कामगारांना बेपत्ता मानण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

नव्या सरकारसमोर आणीबाणीचा प्रसंग...
अध्यक्ष जेअर बोलसोनारो यांच्या नव्या सरकारसमोर प्रथमच आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे. या महिन्याच्या प्रारंभी नव्या सरकारने सूत्रे स्वीकारली होती. सरकारने संरक्षण, खाण आणि पर्यावरण मंत्रालय तसेच मिनास गेराईस राज्याच्या अधिकाºयांमध्ये समन्वय साधून मदतकार्य चालविले आहे. बंधारा फुटल्यानंतर ३९ हजार लोकसंख्या असलेल्या ब्रमादिन्हो शहरालगतच्या परिसरात सर्वत्र चिखल पसरला असून पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून शेतांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक घरेही उद्ध्वस्त झाली. जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

Web Title: The bund was broken in Brazil; 300 people are afraid of blown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.