'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:05 PM2021-08-19T19:05:45+5:302021-08-19T19:08:15+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन
अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत आणि त्यांच्यात भीतीचं वातावरणही पसरलेलं आहे. १९९६ ते २००१ यादरम्यान तालिबान राजवटीच्या क्रूरतेचा सामना करणाऱ्या अफगाण महिलांना पुढील दिवस त्यांच्यासाठी तितकेच भयानक ठरू शकतील अशी भीतीही वाटत आहे. याच भीतीतून अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी सोशल मीडियावरून स्वत:चे फोटो हटवण्यास आणि त्यांचे किट्स जाळण्यास सांगितलं आहे.
कोपहेगनमध्ये असलेल्या खालिदा पोपल हीनं बुधवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. "दहशतवाद्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या राजवटीत महिलांची हत्या केली, बलात्कार केले आणि महिलांवर दगडफेकही केली, यासाठीच महिला फुटबॉलर्स आपल्या भविष्याबाबत चिंतीत आहेत," असं तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं. दरम्यान, यावर अफगाणिस्तान महिला फुटबॉल लीगच्या सह-संस्थापकानंही प्रतिक्रिया दिली. "तिनं कायमच तरुणींना खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रेरित केलं आहे, परंतु तिचा हा संदेश निराळा आहे," असं त्यांनी नमूद केलं.
"आज मी त्यांना त्यांचे नाव बदलण्यास, त्यांची ओळख पुसून टाकण्यास आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी फोटो हटवण्यास सांगत आहे. मी त्यांना राष्ट्रीय संघाची जर्सी हटवण्यास किंवा जाळण्यास सांगत आहे. मी एक कार्यकर्ती म्हणून काम केलं आणि राष्ट्रीय संघात मान्यता मिळवण्यासाठी शक्य ते सर्व केले, माझ्यासाठी हे सर्व खूप वेदनादायक आहे. देशासाठी खेळण्याचा आम्हाला किती अभिमान होता," असंही खालिदानं सांगितलं.
महिला खेळाडूंमध्ये भीती
"महिला खेळाडूंमध्ये खूप भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. असं कोणी नाही ज्यांच्याकडून संरक्षण किंवा मदत मागितली जाऊ शकते. त्यांना भीती वाटते की कधीही कोणीतरी दार ठोठावू शकते. आम्ही देश कोसळताना पाहत आहोत. सर्व अभिमान, आनंद, महिला सक्षमीकरण... हे सर्व व्यर्थ गेलं," अशी खंतही तिनं यावेळी व्यक्त केली.