इसिसने जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले?
By admin | Published: February 4, 2015 09:07 AM2015-02-04T09:07:42+5:302015-02-04T10:56:49+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेने त्यांच्या ताब्यातील जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अम्मान, दि. ४ - इसिस या दहशतवादी संघटनेने त्यांच्या ताब्यातील जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले आहे. यासंबंधी मंगळवारी एक व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित करण्यात आला असला तरीही त्या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळून पाहिली जात आहे. अवघ्या काही दिवासांपूर्वीच इसिसने जपानच्या दोन्ही ओलिसांचा शिरच्छेद करत तशी चित्रफीत जारी केली होती. त्यानंतर त्यांनी आता जॉर्डनच्या नागरिकाचा बळी घेतला आहे.
मोएथ अल-कसाबेह असे त्या वैमानिकाचे नाव असून ट्विटरवर हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये मोएथ एका पिंज-यात उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याला जाळण्यात आले.
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढणा-या सेनेच्या मदतीसाठी जाणा-या मोएथचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन सीरियामधील रक्का येथे पडले आणि तो इसिसचा बंदी बनला. मोएथच्या मृत्यूचे वृत्त खरे असल्याचे जॉर्डनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले असून महिन्याभरापूर्वी त्याची हत्या झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले. मोझच्या सुटकेसाठी इसिसने जॉर्डनच्या ताब्यातील दहशतवाद्यांची सुटका करावी अशी मागणी केली होती.
जॉर्डननने दिली दोन दहशतवाद्यांना फाशी
इसिसने वैमानिकाची हत्या केल्यानंतर जॉर्डन सरकारने एका महिलेसह दोन जणांना फासावर लटकवलं. साजिदा अल रिशवी आणि जियाद अल करबूली अशी त्या दोघांची नावे असून आज सकाळी त्यांनी फाशी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली. २००५ साली जॉर्डनची राजधानी अम्मान येथे तीन हॉटेल्समध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी अल रिशवीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या स्फोटांत अनेक निरपराध नागरिक ठार झाले होते.