पेटलेला बांगलादेश! माजी क्रिकेट कप्तानाचे घर जाळले, सरन्यायाधीशांनाही नाही सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:21 AM2024-08-06T08:21:08+5:302024-08-06T08:21:38+5:30
शेख हसीनांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर हजारो आंदोलक त्यांच्या घरात घुसले होते. त्यांनी तोडफोड, लुटालूट केली होती. अनेकांनी बेडवर झोपून फोटो व्हायरल केले होते.
बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली असून आरक्षणावरून सुरु झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेबाहेरच नाही तर देशाबाहेर करण्यात यशस्वी झाले आहे. शेख हसीनांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर हजारो आंदोलक त्यांच्या घरात घुसले होते. त्यांनी तोडफोड, लुटालूट केली होती. अनेकांनी बेडवर झोपून फोटो व्हायरल केले होते. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे.
बांगलादेशी आंदोलकांनी क्रिकेट टीमचा माजी कप्तान मशरफे मुर्तजाच्या घरालाही आग लावली आहे. नरैलमध्ये मुर्तजाचे घर आहे, ते जाळण्यात आले आहे. मुर्तजा हा बांगलादेशच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचा खासदार आहे. त्याच्यावर बांगलादेशातील आंदोलकांचा नरसंहार आणि विद्यार्थ्यांच्या सामुहिक अटकेवर काही न बोलल्याचा रोष होता. तो आंदोलकांनी बाहेर काढला आहे. २०१८ मध्ये त्याने हसीना यांच्या पक्षात प्रवेश केला होता.
याचबरोबर आंदोलकांनी आपला मोर्चा बांगलादेशच्या सरन्यायाधीशांकडे वळविला आहे. त्यांच्या घरी देखील घुसून लुटालूट केली आहे. काही दिवसांपूर्वी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. यामुळे नागरिकांत सरन्यायाधीशांविरोधातही राग होता.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थानही फोडण्यात आले आहे. रहमान यांची १९७५ मध्ये याच घरात कुटुंबासह हत्या करण्यात आली होती. शेख हसीना आणि त्यांची बहीण परदेशात असल्याने वाचली होती. रहमान यांचे बंगबंधू भवन आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आले आहे.