इराणमध्ये सौदी दूतावास जाळला
By admin | Published: January 4, 2016 02:58 AM2016-01-04T02:58:30+5:302016-01-04T02:58:30+5:30
सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला मृत्युदंड दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी इराणमधील मशहाद या शहरात सौदी अरेबियाच्या दूतावासास आग लावली.
तेहरान : सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला मृत्युदंड दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी इराणमधील मशहाद या शहरात सौदी अरेबियाच्या दूतावासास आग लावली. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने नंतर या गर्दीला हटविण्यात आले.
इराणमधील एका समाचार एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे. सौदीतील ५६ वर्षीय धर्मगुरू निम्र अल निम्र यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २०११ मध्ये निम्र यांनी सरकारविरोधी आंदोलन केले होेते. या आंदोलनाचे ते प्रमुख होते. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आल्यानंतर इराण आणि इराकच्या शिया समुदायात संतापाची लाट उसळली आहे.
समाचार एजन्सीने सांगितले की, दूतावासातून आगीचे लोळ बाहेर येत होते. आंदोलक थेट दूतावासाच्या आत गेले होते; पण पोलिसांनी नंतर त्यांना तेथून बाहेर हटविले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ठिकठिकाणी पोलीस होते आणि त्यांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटविले. या आंदोलकांपैकी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून हटविण्यापूर्वी आंदोलक दूतावासाच्या छतावरही गेले होते. शियाबहुल इराण व सुन्नीबहुल सौदी अरेबियात संघर्ष आहे.
1 तेहरान : सौदीत एका शिया धर्मगुरूंना मृत्युदंडाची शिक्षा दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे की, ज्यांनी हे कृत्य केले त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.
2 इराक, लेबनान, सिरियातूनही या फाशीच्या शिक्षेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदीने काल याबाबत घोषणा करताना सांगितले होते की, शिया धर्मगुरू शेख-निम्र व अन्य ४६ जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे.
3 यातील अनेक जण अल कायदाशी संबंधित असल्याचे सांंगण्यात आले आहे. सौदीच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे त्यात शिया आणि सुन्नी या दोन्ही समुदायांचे लोक होते.