बुरखा परिधान केलेल्या महिलेकडून गणेश मूर्तींची तोडफोड; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:19 AM2020-08-17T10:19:29+5:302020-08-17T10:42:39+5:30
महिलेविरोधात तीव्र संताप; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल
मनामा: मध्य पूर्वेतील बहारिनमध्ये गणेश मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुरखा परिधान केलेल्या एका महिलेनं सुपरमार्केटमध्ये ठेवण्यात आलेल्या गणेश मूर्ती जमिनीवर फेकल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या कृत्याबद्दल महिलेवर टीका होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर बहारिनच्या गृह मंत्रालयानं या प्रकरणी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या शनिवारी म्हणजेच २२ ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हिंदू समाज जगभरात पसरला असल्यानं अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. बहारिनदेखील त्याला अपवाद नाही. एकीकडे गणेशभक्त आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना दुसरीकडे गणेशमूर्तींची तोडफोड होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
This is from Bahrain —
— Seema🇮🇳 (@tripathisam2020) August 16, 2020
Freedom of practice where they are in majority 😠@vivekshettympic.twitter.com/h5BNS72SdJ
बहारिनची राजधानी मनामाजवळ असलेल्या जफेयरमधील एका सुपरमार्केटमध्ये एका महिलेनं गणेश मूर्तींची तोडफोड केली. एका मुस्लिम देशात गणपतीच्या मूर्ती विकण्यास विरोध असल्याचं म्हणत तिनं ही तोडफोड केली. 'हा मुस्लिम देश आहे. इथे याला परवानगी दिली जाऊ शकत नाही,' अशा शब्दांमध्ये महिला दुकानदारावर अरबी भाषेत ओरडताना दिसत आहे. याशिवाय ती सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या मूर्ती जमिनीवर फेकतानाही दिसत आहे.
OMG. OMG. OMG. What the hell is this happening in Bahrain? https://t.co/k7TwMVXd2e
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 16, 2020
घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अनेकांनी महिलेचा समाचार घेतला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ५४ वर्षीय महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गृह मंत्रालयानं ट्विट करत पोलीस कारवाईची माहिती दिली. 'एका ५४ वर्षीय महिलेनं जफेयरमध्ये जाणूनबुजून एका दुकानातल्या मूर्ती तोडल्या. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. मनामाचे पोलीस महासंचालक यात लक्ष घालत आहेत,' अशी माहिती गृह मंत्रालयानं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.