खेळ मांडला; मक्केच्या मशिदीत 'चारचौघी' बोर्ड गेम खेळल्या, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 10:49 AM2018-02-23T10:49:00+5:302018-02-23T11:23:41+5:30
पवित्र मशिदीत अशाप्रकारे खेळाचा डाव मांडणे अयोग्य
रियाध: इस्लामधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या मक्का येथील एक घटना सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. मक्का येथील मशिदीत काही बुरखाधारी महिला 'बोर्ड गेम' खेळत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून सौदी अरेबियात मोठा वाद पेटला आहे. हा प्रश्नाने इतके गंभीर स्वरुप धारण केले की, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सौदी अरेबियाच्या सरकारला पत्रकारपरिषद घेऊन याविषयी माहिती द्यावी लागली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी 11 वाजता चार महिला मशिदीत 'सिक्वेन्स' हा बोर्ड गेम खेळत बसल्या होत्या. काही वेळातच ही गोष्ट सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर याठिकाणी महिला अधिकाऱ्यांना पाठवून संबंधित महिलांना पुन्हा असा प्रकार न करण्याविषयी समज देण्यात आली. येथील पावित्र्य जपले जावे, असेही अधिकाऱ्यांनी महिलांना सांगितले. त्यानंतर आपली चूक मान्य करून महिला तेथून निघून गेल्या. परंतु, त्यानंतर या महिलांचे बोर्ड गेम खेळत असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. संपूर्ण अरब जगतात हे छायाचित्र चर्चेचा विषय झाल्याची माहिती 'स्टेप फीड' या संकेतस्थळाने दिली.
या छायाचित्रावर अनेक परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहीजणांनी पवित्र मशिदीत अशाप्रकारे खेळाचा डाव मांडणे अयोग्य असल्याचे सांगत या प्रकाराविषयी नापसंती दर्शविली आहे. यापूर्वी 2015 मध्ये सौदी अरेबियातील मस्जिद-ए-नबवी येथे काही तरूण मुले पत्ते खेळताना आढळली होती. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. या मुलांना अटकही करण्यात आली होती.