मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकची भीषण धडक, अपघातानंतर बसला लागली आग, ४१ जणांचा जळून कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 10:29 IST2025-02-09T10:28:06+5:302025-02-09T10:29:11+5:30
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत ४१ जणांचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली.

मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकची भीषण धडक, अपघातानंतर बसला लागली आग, ४१ जणांचा जळून कोळसा
मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत ४१ जणांचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली. बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या अपघाताबाबत मेक्सिको सरकारने दिलेल्या माहितीनुसार बसमधून ४८ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३८ प्रवासी आणि बसचे दोन्ही ड्रायव्हर यांचा या अपघातानंतर लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला. तसेच ट्रक ड्रायव्हरचाही या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तसेच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.
दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी १८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मात्र मृतदेह ओळखण्यापलिकडे गेले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या संचालक कंपनीने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात कसा झाला आणि अपघात झाला तेव्हा बस वेगमर्यादेमध्ये होती का? याचा तपास अधिकाऱ्यांसोबत मिळून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.