चाबहारमुळे मध्य आशियासाठी उघडले व्यापाराचे द्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 04:28 PM2017-12-04T16:28:03+5:302017-12-04T16:37:05+5:30

चाबहार बंदरामुळे भारत आणि इराणशीही संबंध वाढणार आहेत.या प्रकल्पाचा करार 15 वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता.

Business Opportunity opened for Central Asia due to Chabahar | चाबहारमुळे मध्य आशियासाठी उघडले व्यापाराचे द्वार

चाबहारमुळे मध्य आशियासाठी उघडले व्यापाराचे द्वार

Next
ठळक मुद्देचाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपुर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती.भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

नवी दिल्ली- भारताने इराणमध्ये बांधलेल्या चाबहार या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. भारताला या बंदरामुळे पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तानशी व्यापार करणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर मध्य आशियातील देशांशी व्यापारही आता वेगाने आणि अधिक सुकर होणार आहे. चाबहार बंदरामुळे भारत आणि इराणशीही संबंध वाढणार आहेत.या प्रकल्पाचा करार 15 वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता.

अफगाणिस्तानला समुद्रकिनारा नसल्यामुळे या देशाला इतकी वर्षे शेजारच्या पाकिस्तानवर अवलंबून राहावे लागे. पाकिस्तानच्या बंदरांमधून आलेला माल अफगाणिस्तानमध्ये रस्तेमार्गाने पोहोचवला जाई. आता चाबहार बंदरामुळे पाकिस्तानवर दबाव आणून भारताला रस्तेमार्गेही अफगाणिस्तानशी व्यापार करता येणार आहे. भारत, इराण, रशिया, युरोप आणि मध्य आशियातील समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्गांच्या इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचाही भारत या बंदरामुळे जास्तीत जास्त वापर करु शकणार आहे. चाबहारमुळे भारत एकदम मध्य आशियाच्या व्यापारद्वाराशी पोहोचला आहे. गेली काही वर्षे चीने अरबी समुद्रामध्ये आपला वावर वाढवला आहे. त्याचप्रमाणे मालदिव आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील देशांशीही संबंध वाढवले आहेत. अशा स्थितीत भारताने चाबहारचा विकास करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे चीनने पाकिस्तानमध्ये विकसीत केलेले ग्वादर बंदर चाबहार पासून केवळ 100 किमी अंतरावर असल्यामुळे एकप्रकारे चीनला शहच दिल्यासारखे आहे.

इंधन स्वस्त होणार ?
भारताला सर्वात मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणारी वस्तू म्हणजे इंधन. चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी इराणवर बंधने घातल्यानंतर भारताने इराणकडून आयात केल्या जाणाऱ्या इंधनात वाढ केली. आता या बंदरामुळे ही आयात आणखी वाढू शकेल. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे. चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे. त्याचप्रमाणे रशिया, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत पोहोचू शकेल.

चाबहारचे महत्त्व-
चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपुर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतापासून चाबहार पर्यंत रेल्वेमार्ग बांधण्यात येत आहे, तसेच काबूलपासून 130 किमी अंतरावरील हाजिगाक कोळसा क्षेत्रात कोळसा उत्खननाचे हक्कही भारताला मिळाले आहेत. चाबहार-मिलाक-झारांज-दिलाराम असा रस्ता भारत बांधत असल्यामुळे अफगाणिस्तानसोबतही भारताचा व्यापार वाढणार आहे. इराण-पाकिस्तान- भारत या वायूवाहिनी प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर भारत आणि इराण अरबी समुद्रातून वायू वाहिनी नेण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे पाकिस्तानला शह बसणार आहे
 

Web Title: Business Opportunity opened for Central Asia due to Chabahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत