भारत-चीन, अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:50 AM2018-06-17T03:50:55+5:302018-06-17T03:50:55+5:30
अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली/बीजिंग : अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे. चीननेही अमेरिकी वस्तूंवर ५० अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर प्रस्तावित केले आहेत. या घडामोडींमुळे अमेरिका आणि भारत-चीन यांच्यात व्यापार युद्धच छेडले गेले आहे.
अमेरिकेने गेल्या महिन्यात स्टीलवर २५ टक्के, तर अल्युमिनियमवर १० टक्के आयात कर लावला होता. या करामुळे भारताला २४१ दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेला टार्गेट करून ३० वस्तूंवरील आयात शुल्कातील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेला या निर्णयाची माहिती भारताने अधिकृतरीत्या कळविली आहे. भारत सरकारच्याा सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने आमच्या वस्तूंवर जेवढ्या रकमेचे कर लावले आहेत, तेवढ्याच रकमेचे कर आम्हीही प्रस्तावित केले आहेत.
भारताकडून आयात कर लावण्यात येणाऱ्या वस्तूंत मोटार सायकली, ठराविक लोखंड, पोलादी वस्तू, बोरिक अॅसिड, मसूर डाळ, चणे, ताजी सफरचंदे, अक्रोड, बदाम, शुद्ध केलेले पामतेल, ८०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटार बाइक्स, वैद्यकीय निदानासाठी वापरली जाणारी घटकद्रव्ये, आटा असलेले नट यांचा समावेश आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या ‘सुरक्षा उपाय करारा’च्या अधीन राहून भारताने हे कर प्रस्तावित केले आहेत. अमेरिकेच्या आयात करास भारताने याआधीच आक्षेप घेतला होता. अमेरिकेने आयात कराचा निर्णय कायम ठेवल्यास आम्हीही २१ जून २०१८ पासून आयातकराची सवलत काढून घेऊ, असे भारताने म्हटले होते.
>चीनकडून ६५९ वस्तूंवर अतिरिक्त कर
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक आदेश जारी करून चिनी वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावला होता. या करांमुळे चीनला ५० अब्ज डॉलरचा फटका बसणार आहे. चीनने आज अमेरिकी वस्तूंवर तेवढ्याच रकमेचे कर लावून फिट्टमफाट केली. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले की, अमेरिकेच्या ६५९ वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. त्यातून चीनला ५० अब्ज डॉलरचा लाभ होईल. चीनने लावलेल्या करांत कृषी उत्पादने, वाहने, जल उत्पादने, रासायनिक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि ऊर्जा उत्पादने यांचा समावेश आहे.