पठाणकोट हल्ल्यामुळे चर्चेला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 03:27 AM2016-01-31T03:27:09+5:302016-01-31T03:27:09+5:30
पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे
इस्लामाबाद : पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराला आणि त्यातही लष्करप्रमुख राहील शरीफ यांना संदेश म्हणून मानले जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा व्हावी यासाठी नवाज शरीफ प्रयत्नशील होते; पण लष्कर अशा चर्चेला अनुकूल नव्हते. त्याचवेळी पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेचा इन्कारही केला जात नाही.
पठाणकोट हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले की, भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार
आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी भारत करीत आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.
पठाणकोट हल्ल्यामागे मसूदच्या असलेल्या भूमिकेचा पुरावा भारताने पाकिस्तानला दिला आहे; पण तीन आठवडे होऊनही पाकिस्तानने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील विदेश सचिवांची चर्चाही लटकली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई केल्यानंतरच चर्चा सुरू केल्याचे संकेत भारत सरकारने दिले आहेत. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ पुढे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्याची चौकशी लवकरच पूर्ण होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या पाकिस्तानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंध योग्य दिशेने जात होते; पण पठाणकोट हल्ल्याने ही प्रक्रिया थांबली. परंतु आता दहशतवादी पराभूत झाले असून, ते निराश झाले आहेत. आपली उपस्थिती दाखविण्यासाठीच ते अशा घटना घडवून आणत आहेत.
भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. पठाणकोट हल्ल्यासाठी आमच्या जमिनीचा वापर करण्यात आला काय? हे शोधून काढण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते काम करू .
- नवाज शरीफ