Cadbury Chocolate : 'लिस्टेरिया' आजाराची भीती, युकेमधून कॅडबरी चॉकलेट डेझर्ट परत मागवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:06 PM2023-05-02T17:06:03+5:302023-05-02T17:07:11+5:30
लिस्टरियाच्या भीतीने यूकेमधील स्टोअर्समधून कॅडबरीची हजारो उत्पादनं परत मागवली जात आहेत.
लिस्टरियाच्या भीतीने यूकेमधील स्टोअर्समधून कॅडबरीची हजारो उत्पादनं परत मागवली जात आहेत. स्काय न्यूजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. ज्या लोकांनी या बॅचमधून उत्पादनं खरेदी केली आहेत त्यांना ते न खाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याऐवजी रिफंडसाठी ते त्यांना परत करण्यास सांगण्यात आल्याचं स्काय न्यूजनं म्हटलंय. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, लिस्टेरिया संसर्ग अन्नातून पसरणारा आजार (ज्याला लिस्टेरियोसिस म्हटलं जातं) असल्याचं म्हटलं जात आहे. सामान्यत: लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियानं दूषित अन्न खाल्ल्यानं हा आजार होतो. बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्यानं गर्भवती महिला आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सर्वात जास्त धोका असतो.
ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीनं (FSA) ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर उत्पादनांची एक्सपायरी तारीख तपासण्याचं आवाहनदेखील केलंय. एजन्सीनं क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स ७५ ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबद्दल अलर्ट जारी केला आहे. सर्व सुपरमार्केटमध्ये याची स्वतंत्रपणे विक्री केली जात असल्याचं स्काय न्यूजनं म्हटलंय. क्रंची आणि फ्लेक डेझर्ससाठी अनुक्रमे १७ आणि १८ मे पर्यंत वापरण्याच्या तारखा आहेत. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर सुपरमार्केट चेन मूलर हे प्रोडक्ट परत मागवत असल्याची माहितीही समोर आलीये.
“लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या शक्यतेमुळे म्युलरनं विविध कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. सावधगिरीचं पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय,” अशी माहिती एफएसएनं निवेदनाद्वारे दिली. लिस्टरिओसिसची लक्षणं फ्लूसारखीच असतात. यामध्ये ताप, स्नायूंचं दुखणं किंवा वेदना, थंडी वाजून येणं, आजारी असणे किंवा अतिसार यांचा समावेश असल्याचं सीडीसीनं म्हटलंय.
... तर गर्भपाताचाही धोका
लिस्टेरिया संसर्गाचे संकेत आणि लक्षणं संसर्ग झालेली व्यक्ती आणि प्रभावित शरारीच्या भागानुसार निरनिराळे असू शकतात असंही आरोग्य यंत्रणेनं म्हटलंय. क्वचित प्रसंगी, संसर्ग अधिक गंभीरदेखील ठरू शकतो. यामुळे मेनिन्जायटिस सारख्या समस्या उद्भवू शकतात. तर दुसरीकडे जर गर्भवती महिलेला लिस्टिरियोसिस झाला तर गर्भपात होण्याचा धोका असतो, असंही सांगण्यात आलंय.