कॅलिफोर्निया हल्ला; दहशतवादी कृत्य मानून तपास
By admin | Published: December 6, 2015 03:26 AM2015-12-06T03:26:35+5:302015-12-06T03:26:35+5:30
कॅलिफोर्नियात झालेल्या गोळीबारास दहशतवादी कृत्य मानून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती या घटनेचा तपास करीत असलेल्या एफबीआयने दिली.
वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियात झालेल्या गोळीबारास दहशतवादी कृत्य मानून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती या घटनेचा तपास करीत असलेल्या एफबीआयने दिली.
पतीसह हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानी महिलेने फेसबुकवर इस्लामिक स्टेट (इसिस) व या संघटनेच्या नेत्यांप्रती एकनिष्ठता दर्शविल्याची वृत्ते झळकल्याच्या पार्श्वभूमीवर एफबीआयने हा खुलासा केला.
महाधिवक्ता लोरेटा ई लिंच यांच्यासह एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एफबीआयचे संचालक जेम्स कोमे म्हणाले की, ‘हल्लखोर दाम्पत्य कट्टरवादी असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे या हल्ल्याला दहशतवादी घटना मानून तपास करण्यात येत आहे. एफबीआय करीत असलेली चौकशी ही आता दहशतवादी घटनेची केंद्रीय चौकशी आहे. सान बर्नार्डिनोत १४ जणांचा बळी घेणारे हल्लखोर एखाद्या मोठा कटाचा भाग होते किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते, असे कोणतेही संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत.
हल्लेखोर पाकिस्तानी महिला ताशफीन हिने फेसबुकवर इसिसचा नेता अल-बगदादी याच्याप्रती निष्ठा ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला होता, अशी माहिती अमेरिकी तपास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली होती. सहा महिन्यांच्या बालिकेची आई असलेली ताशफीन पाकिस्तानी नागरिक होती. तिचा पती फारुकचे आई-वडील पाकिस्तानातून अमेरिकेत आले होते. हे दोन्ही हल्लेखोर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले.
इसिस समर्थक वृत्तसंस्था अमकने हल्लेखोरांना इसिसबाबत सहानुभूती असलेले जोडपे संबोधले; मात्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. हल्लेखोर एखाद्या मोठ्या गटाचे सदस्य होते, असे कोणतेही संकेत चौकशीच्या पहिल्या दोन दिवसांत मिळाले नाहीत. हे दोघे एखाद्या मोठ्या जाळ्याचे सदस्य होते यात शंका नाही; मात्र तसे अद्यापही समोर आले नाही. आम्ही समजून घेण्यासाठी परिश्रम घेत आहोत, असे एफबीआय प्रमुखांनी सांगितले.
हल्लेखोर दाम्पत्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा, तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य आढळून आले. हल्ल्यापूर्वी हे साहित्य नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न या जोडप्याने केला होता; मात्र आता हे साहित्य आमच्याकडे असून त्याद्वारे आम्ही काही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. (वृत्तसंस्था)
या जोडप्यापैकी एक जण एफबीआय चौकशीच्या घेऱ्यात असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होता, अशी वृत्ते मी पाहिली आहेत. ती चौकशी कदाचित बंद झाली असावी किंवा मग अजूनही सुरू असेल.
संशयितांच्या घरातून थेट प्रक्षेपण, मीडियावर टीका
1 कॅलिफोर्निया हल्लेखोरांच्या घराचे थेट प्रक्षेपण केल्याबद्दल प्रेक्षक व सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी अमेरिकी मीडियावर सडकून टीका केली आहे.
2 हल्लेखोर राहत असलेले किरायाचे घर अमेरिकी मीडियाला खुले करण्यात आल्यानंतर या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत खासगी अशा वस्तूंचेही थेट प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकी मीडियाचे हे कृत्य बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगत सोशल मीडियात त्यावर टीका करण्यात आली.
3 सीएनएन व एमएसएनबीसी यासारख्या लोकप्रिय वृत्तवाहिन्यांनी संशयित हल्लेखोर सैयद रिजवान फारुक (२८), ताशफीन मलिक (२७) यांच्या बाळाची खेळणी, फाटलेल्या संचिका, कम्प्युटर उपकरणे दाखवत घराचे थेट प्रेक्षपण केले.
4 यानंतर काही तासांनी वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्तवाहिन्यांनी अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वृत्तांकन केल्याची टीका केली. अनेक प्रेक्षक व माध्यम तज्ज्ञ या वृत्तांकनाबाबत हैराण आहेत, असे वॉल स्ट्रीटने म्हटले.