California WildFire: कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 03:58 PM2018-11-16T15:58:28+5:302018-11-16T17:59:30+5:30
कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्याने अभूतपूर्व रौद्ररुप धारण केले असून एक अख्खे शहर जळून खाक झाले आहे.
वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्याने अभूतपूर्व रौद्ररुप धारण केले असून एक अख्खे शहर जळून खाक झाले आहे. या आगीने आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील जवळपास 12 हजार घरे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. अद्याप 631 लोक बेपत्ता आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये आगीपासून लोकांना वाचविण्यासाठी 10 हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र, वेगवान वाऱ्यांमुळे आग वेगाने इतर भागात पसरत आहे. कॅलिफोर्नियातील पॅराडाईज हे शहर पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. हे शहर पुन्हा वसविण्यासाठी काही वर्षे लागणार असल्याचे तेथील अधिकारी सांगतात.
बेपत्ता लोकांच्या शोधासाठी लष्कर आणि श्वानपथकांची मदत घेण्यात येत आहे. या शोधमोहिमेला काही आठवडे लागू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी या भागाचा दौरा करणार आहेत.
8 नोव्हेंबरला ही आग लागली होती. यानंतर हजारो फोन मदत मिळविण्यासाठी करण्यात आले होते. त्यांची चौकशी करून बेपत्ता लोकांची यादी बनविण्यात आली आहे.
राज्याच्या अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नसले तरीही स्थानिक लोकांनी पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रीक कंपनीविरोधात याचिका दाखल केली आहे. यानंतर कंपनीचे समभाग 31 टक्क्यांन घसरले.