कॉल सेंटर घोटाळा : अमेरिकेत भारतीय वंशाच्या 21 जणांना कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 01:49 PM2018-07-21T13:49:29+5:302018-07-21T13:49:55+5:30
कोट्यवधी डॉलरच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 21 जणांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यूयॉर्क - कोट्यवधी डॉलरच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 21 जणांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी काही आरोपींना 20 वर्षांपर्यत कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. भारतात असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी डॉलरचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात चाललेल्या खटल्यानंतर 21 आरोपींना 4 ते 20 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपींना शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतात परत पाठवण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अॅटॉर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉल सेंटर घोटाळ्याच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी डॉलरचा गंडा घातला गेला होता. आरोपींनी भारतातील कॉल सेंटरमधून खोट्या योजनांची माहिती देणारे फोन करून अमेरिकन नागरिकांना गंडवले होते. गुजरातमधील अहमदाबादमधील कॉल सेंटरमधून हे फोन करण्यात आले होते. तसेच आपण अमेरिकेच्या महसूल खात्यातीत किंवा सिटिझनशिप आणि इमिग्रेशन खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी करून गंडा घालण्यात आला होता.