५७ वर्षांची लोलिता पुन्हा समुद्रात जगू शकेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:56 AM2023-04-13T05:56:57+5:302023-04-13T05:57:14+5:30
आतापर्यंत अमेरिकेत फिरायला जाऊन आलेल्या लोकांच्या तोंडी ‘डॉल्फिन शो’चं फार कौतुक असायचं.
आतापर्यंत अमेरिकेत फिरायला जाऊन आलेल्या लोकांच्या तोंडी ‘डॉल्फिन शो’चं फार कौतुक असायचं. मोठ्या मोठ्या पूलमध्ये पाळलेले अजस्त्र डॉल्फिन्स आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या करामती करणारे तरुण आणि तरुणी हे अनेक टूर्समध्ये मोठं आकर्षण असायचं. एरवी खुल्या समुद्रात शिकार करून जगणारे हे मासे खूप माणसाळलेले आणि प्रशिक्षित असायचे. त्यांच्यासाठी मोठं खाऱ्या पाण्याचं मत्स्यालय बांधलेलं असायचं. या खेळांच्या जीवावर अनेक मत्स्यालयवाल्यांनी खूप पैसे कमावले; पण या मत्स्यालयात राहणाऱ्या या डॉल्फिन्सचा कोणी फार विचार करीत नसे. यामध्ये समुद्री जीवांचं नैसर्गिक जीवन कसं असतं याबद्दलचं अज्ञान आणि एकूणच संवेदनशीलतेचा अभाव ही मोठीच कारणं होती. मात्र, हळूहळू वन्य प्राण्यांच्या अधिकारांबद्दल सगळीकडेच जागरूकता वाढायला लागली आणि कुठल्याही प्रकारे पकडून ठेवलेल्या वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात सोडून द्यावं, ही मागणी जोर धरू लागली.
याच चळवळीचा परिणाम म्हणून अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचं वय असलेल्या लोलिता नावाच्या ओर्का जातीच्या डॉल्फिन शार्कला पुन्हा खुल्या समुद्रात सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये जरी विजयाची भावना निर्माण झालेली असली, तरी प्रत्यक्षात लोलिताला खुल्या समुद्रात परत सोडून देणं हे फार अवघड काम आहे. कारण तिला खुल्या समुद्रातील जीवनाची काही माहितीची नाहीये आणि ती असणार तरी कशी?
लोलिता आणि तिच्यासारख्या आणखी ७९ डॉल्फिन्सना एका मच्छीमाराने वॉशिंग्टनजवळच्या एका बेटाजवळ पकडलं, ते साल होतं १९७०. त्यावेळी लोलिता चार वर्षांची होती. आज ती ५७ वर्षांची आहे. तिच्या एकूण आयुष्यातील ५० वर्षे ती मियामी सिक्वेरियममध्ये राहिली आहे. मियामी सिक्वेरियम हे उत्तर अमेरिकेतील सगळ्यात छोट्या खाऱ्या पाण्याच्या मत्स्यालयांपैकी एक आहे. लोलिता जिथे आयुष्यभर राहिली त्या तलावाची लांबी आहे ८० फूट आणि रुंदी आहे ३५ फूट. म्हणजे एखाद्या टेनिस कोर्टच्या आकाराएवढी. ओर्का जातीच्या फिमेल्सची सरासरी लांबी असते सुमारे १८ ते २२ फूट. हे लक्षात घेतलं म्हणजे तिला तो तलाव किती लहान पडत असेल याची कल्पना करता येऊ शकते.
लोलिताने या कैदेतील आयुष्याशी जुळवून घेतलं खरं; पण इतर अनेक डॉल्फिन्स आणि शार्क्सना ते शक्य झालं नाही. लोलिताचा पहिला पार्टनर होता ह्युगो. त्याची आणि लोलिताची जोडी चांगली जमली होती. मात्र, ह्युगोला हे कैदेतील आयुष्य सहन झालं नाही. तो सतत तलावाच्या भिंतींवर डोकं आपटत राहायचा. त्यातून त्याच्या मेंदूला इजा झाली आणि त्यामुळे त्याचा १९८० साली मृत्यू झाला. त्यानंतर लोलिताची इतर डॉल्फिन्सशी जोडी जमविण्यात आली. तिचे खेळ लावून त्यातून पैसे कमावण्याचा उद्योग सुरूच राहिला.
संपूर्ण आयुष्य इतक्या छोट्या तलावात काढल्यानंतर लोलिता मैलोनमैल पसरलेल्या खुल्या समुद्रात जगू शकेल का? आयुष्याची पन्नास वर्षे तिला ठरल्या वेळी ठरलेलं अन्न मिळण्याची सवय झाल्यानंतर ती आपली आपण शिकार करून पोट भरू शकेल का? ती तिच्या आयुष्यातील पहिल्या चार वर्षांत जे शिकली असेल ते तिला आठवत असेल का? हे सगळेच प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.
ही उत्तरं शोधण्यासाठी लोलिताला हळूहळू जास्त मोठ्या तलावात, मग सुरक्षित वातावरणातील समुद्राच्या एखाद्या भागात, असं टप्प्याटप्प्याने सोडून तिला त्या वातावरणाची सवय करण्यात येईल आणि मगच तिला तिच्या वस्तीच्या जवळ सोडून देण्यात येईल. लोलिता खुल्या समुद्रात जगू शकेल का? तिला तिचं कुटुंब पुन्हा भेटेल का? असे अनेक प्रश्न आहेत; पण या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना एक आशेची किनार आहे.
लोलिताच्या कुटुंबातील काही माशांचे आवाज ध्वनिमुद्रित करून लोलिताला ऐकवण्यात आले तेव्हा तिने ते ओळखले. पाण्यात उड्या मारून त्या आवाजांना प्रतिसादही दिला असाच प्रतिसाद तिच्या हाकांना तिचे कुटुंबीय देतील अशी आशा वाटायला नक्कीच वाव आहे.
किको पुन्हा समुद्रात गेला आणि...
अनेक वर्षं मत्स्यालयात राहिलेला किको हा खुल्या समुद्रात परत गेलेला आजवरचा एकमेव डॉल्फिन शार्क आहे. किको म्हणजेच फ्री विली या सिनेमात दिसलेला डॉल्फिन होय. समुद्रात परत गेल्यानंतर एका वर्षातच त्याचा न्यूमोनियाने मृत्यू झाला होता. मात्र, कमी काळातच परत सोडलेले ओर्का जातीचे मासे पुन्हा समुद्रात नैसर्गिक जीवन जगतानाचं शूटिंगही उपलब्ध आहे. त्यामुळे
ओर्का परत समुद्रात जाऊ शकतात, अशी आशा अभ्यासकांना वाटते.