मुंबईत राहत असलो तरी US व्हिसा मुलाखतीसाठी चेन्नईमध्ये अर्ज करू शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 01:21 PM2017-09-08T13:21:33+5:302017-09-11T12:45:40+5:30
जर, तुम्ही तुमच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकामापासून दुसऱ्या ठिकाणी अर्ज करत असाल, तर मुलाखतीच्या वेळी त्याचं यथोचित कारण देण्यासाठी तयार रहा
प्रश्न - मी मुंबईत राहतो. परंतु व्यावसायिक कामासाठी मी चेन्नईला जात आहे. एरवी मी मुंबईत राहत असलो तरी मी चेन्नईमध्ये असताना अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतो का?
उत्तर - होय, तुम्ही नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अमेरिकेच्या कुठल्याही काउन्सलेट किंवा दूतावासामध्ये अर्ज करू शकता. जर, तुम्ही तुमच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकामापासून दुसऱ्या ठिकाणी अर्ज करत असाल, तर मुलाखतीच्या वेळी त्याचं यथोचित कारण देण्यासाठी तयार रहा. व्हिसा संदर्भात अमेरिकेची सगळी काउन्सलेट व दूतावास समान कायदे व प्रक्रिया अवलंबतात. एका काउन्सलेटच्या तुलनेत दुसऱ्या ठिकाणी व्हिसा मिळवणं सोपं असतं अशी परिस्थिती नाहीये.
अर्थात, एक लक्षात ठेवा की प्रत्येक अमेरिकी काउन्सलेटमध्ये स्थानिक गरजांनुसार स्थानिक भाषांमधल्या अनुवादकांची व्यवस्था केलेली असते. उदाहरण द्यायचं तर गुजराती अनुवादक मुंबईतल्या अमेरिकी काउन्सलेटमध्ये आहेत, परंतु ही सोय चेन्नईमध्ये नाहीये. मुलाखतीसाठी वेळ कुठे घ्यायची हे निश्चित करताना त्या ठिकाणी तुम्ही किती काळ असणार आहात याचा विचार करा. व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या कारणांमुळे एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. बायोमेट्रिक पडताळणी कधी आहे, व्हिसा अर्ज प्रक्रियेसाठी जास्त वेळ लागेल का आदी बाबींचा यात समावेश आहे.
तुमची मुलाखत कुठेही झाली तरी तुम्ही पासपोर्ट घ्यायची जागा निवडू शकता. त्यामुळे तुम्ही जर मुलाखतीनंतर लगेच तुम्ही घरी परतणार असाल तर ustraveldocs.com/in इथं अर्ज भरताना पासपोर्ट ताब्यात घेण्याची जागा घराजवळची निवडा.