अमेरिकेत जाण्याचा प्लान निश्चित नसताना व्हिसासाठी अर्ज करता येतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 02:38 PM2020-02-15T14:38:09+5:302020-02-15T14:42:11+5:30
अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्याकडे प्रवासाची योजना असणं गरजेचं नाही. अमेरिकेत जाण्याआधी तुम्ही कधीही व्हिसासाठी अर्ज करू शकता. प्रवासाची योजना नक्की होण्याआधीही तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करता येतो.
प्रश्न- मी भविष्यात अमेरिकेला जाण्याची योजना आखत आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मला कुटुंबाला भेटायला अमेरिकेला जायचं आहे. मात्र मी विमानाचं तिकीट काढलेलं नाही. तरीही मी व्हिसासाठी अर्ज करू शकतो का? त्यासाठीच्या मुलाखतीत नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?
उत्तर- तुम्ही या स्थितीतही व्हिसासाठी अर्ज करू शकता. अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्याकडे प्रवासाची योजना असणं गरजेचं नाही. अमेरिकेत जाण्याआधी तुम्ही कधीही व्हिसासाठी अर्ज करू शकता. प्रवासाची योजना नक्की होण्याआधीही तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करता येतो.
कुटुंबातील सदस्याची भेट घेण्यासाठी B-1/B-2 व्हिसा अतिशय योग्य आहे. B-1/B-2 व्हिसासाठी अर्ज करण्याचे तीन टप्पे आहेत. सर्वप्रथम, नॉनइमिग्रंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक अॅप्लिकेशन अर्ज (डीएस-१६०) ऑनलाइन भरा. यानंतर व्हिसा अर्जाचं शुल्क भरुन दोन वेगवेगळ्या अपॉईंटमेंट्स घ्या. यातील एक अपॉईंटमेंट व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरमध्ये (व्हीएसी) जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स देण्यासाठी आणि दुसरी अपॉईंटमेंट दूतावास किंवा वकिलातीतल्या मुलाखतीसाठी असेल.
मुलाखतीसाठी जास्त कागदपत्रं आणण्याची गरज नाही. अमेरिकन व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून मुलाखतीवर आधारित आहे. B-1/B-2 व्हिसासाठी मुलाखत देत असताना तुमचा पासपोर्ट आणि डीएस-१६० चं कन्फर्मेशन पेज घेऊन या. अमेरिकेच्या व्हिसा अर्जात तुम्ही अमेरिकेत कुठे जाणार आहेत आणि किती दिवस मुक्काम करणार आहात, याबद्दलचे प्रश्न असतात. यावेळी विमान प्रवासाची आणि हॉटेल मुक्कामाची माहिती देणं अपेक्षित नसतं. पासपोर्ट आणि व्हिसा मिळाल्याशिवाय विमानाची तिकीटं बूक करू नका, असा सल्ला आम्ही अर्जदारांना देतो.
व्हिसा अपॉईंटमेंट मिळण्यासाठी लागणारा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. त्यामुळे तुमच्या प्रवासाला पुरेसे दिवस शिल्लक असताना व्हिसासाठी अर्ज करा.
B-1/B-2 व्हिसाचा वापर विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये कुटुंबाची भेट, सुट्टी, व्यावसायिक परिषदेचा समावेश आहे. एकदा व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही मुदत संपेपर्यंत त्याचा वापर करू शकता.
तुम्ही वैध व्हिसाचा वापर करुन कितीही वेळा अमेरिकेत जाऊ शकता. कधी कधी प्लान्स बदलू शकतात याची आम्हाला कल्पना आहे. B-1/B-2 व्हिसा काढण्यामागच्या तुमच्या हेतूत बदल झाला तरीही तुम्ही B-1/B-2 व्हिसा परवानगी देत असलेल्या इतर कारणांसाठी अमेरिकेत जाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची सुट्टी एक किंवा दोन वर्षांनी पुढे ढकलली, तरीही तुमच्या पासपोर्टची वैधता संपेपर्यंत तुमचा व्हिसा वैध राहतो. सध्या भारतीयांना मिळणाऱ्या B-1/B-2 ची मुदत दहा वर्षे इतकी आहे.