दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही
By admin | Published: July 16, 2014 10:53 PM2014-07-16T22:53:08+5:302014-07-16T22:53:08+5:30
भारताची दहशतवादावरील भूमिका उचलून धरत ‘ब्रिक्स’ने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांची, तसेच कारवायांची घोर निर्भर्त्सना केली
फोर्टालेझा : भारताची दहशतवादावरील भूमिका उचलून धरत ‘ब्रिक्स’ने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांची, तसेच कारवायांची घोर निर्भर्त्सना केली. विचारसरणी, राजकीय किंवा धार्मिक मुद्यावर आधारलेल्या कोणत्याही दहशतवादी कृत्याचे समर्थन करताच येऊ शकत नाही, असेही जगातील पाच प्रमुख विकसनशील देशांच्या या संघटनेने ठासून सांगितले.
मंगळवारी रात्री ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाल्यानंतर १७ पानी फोर्टालेझा जाहीरनामा जारी करण्यात आला. यात म्हटले आहे की, दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत, उत्तेजन, प्रशिक्षण किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यापासून परावृत्त व्हा, असे आवाहन आम्ही सर्व संस्थांना करतो. दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारवाईसाठी समन्वय घडवून आणण्यात संयुक्त राष्ट्राची प्रमुख भूमिका असल्याचे आम्ही मानतो. संयुक्त राष्ट्राची घटना, आंतरराष्ट्रीय कायदा, तसेच मानवाधिकार, मूलभूत स्वातंत्र्याचा आदर राखत ही कारवाई केली जावी. ब्रिक्स जाहीरनाम्यात जगभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक हेरगिरी करण्याच्या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)