‘दहशतवादी हल्ल्यामुळे कॅनडा घाबरणार नाही’
By admin | Published: October 24, 2014 03:27 AM2014-10-24T03:27:48+5:302014-10-24T03:27:48+5:30
संसदेवर हल्ला झाला म्हणून कॅनडा घाबरणार नाही, असे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले आहे.
ओटावा- संसदेवर हल्ला झाला म्हणून कॅनडा घाबरणार नाही, या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आमची सज्जता आम्ही अधिक मजबूत करूव दहशतवादाशी लढण्याचा निर्धार अधिक बळकट करू असे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले आहे.
टोरंटो स्टार या वृत्तपत्राने पंतप्रधान हार्पर यांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. आम्ही घाबरणार नाही, कॅनडा कधीही घाबरणार नाही असे हार्पर म्हणाले. संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ते देशातील जनतेला उद्देशून बोलत होते.
या हल्ल्यामुळे आमचा निर्धार अधिक बळकट होईल. सुरक्षा दल अधिक सतर्क होईल व संकटाचा वेळीच मुकाबला करून कॅनडाचे नागरिक सुरक्षित ठेवले जातील, असे हार्पर म्हणाले; पण यासाठी कोणती पावले उचलली जातील, कोणत्या दिशेने प्रयत्न केले जातील हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
या आठवड्यात कॅनडात दोन हिंसक हल्ले झाले आहेत. दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कॅनडाही दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित नाही हेच या हल्ल्याने दाखवून दिले आहे असे हार्पर म्हणाले. कॅनडाची लोकशाही, मूल्ये व समाज यांच्यावर हा थेट हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)