भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 09:52 AM2023-09-29T09:52:22+5:302023-09-29T09:52:57+5:30
अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती.
नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतासोबत चांगले घनिष्ट संबंध बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं विधान कॅनडाच्या पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, जून महिन्यात ब्रिटिश कोलंबिया इथं झालेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात होता या आरोपानंतरही कॅनडा आजही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. मॉन्ट्रियलच्या एका संमेलनात ते बोलत होते. कॅनडा आणि सहकारी देश जागतिक पातळीवर भारताचे वाढते महत्त्व पाहता त्यांच्यासोबत कायम संबंध ठेवण्यासाठी आम्ही गंभीर आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शक्ती महत्त्वपूर्ण आहे. मागील वर्षी आम्ही इंडो पॅसिफिक रणनीतीचा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी गंभीर आहोत. कॅनडासोबत मिळून काम करणे आवश्यक आहे हे भारतानेही निश्चित करायला हवे असं पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटलं. तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात आहे असा आरोप करणाऱ्या ट्रुडो यांना अमेरिकेकडून झटका मिळाला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती. परंतु या भेटीत अमेरिकेकडून निज्जर आणि कॅनडा यांचाही साधा उल्लेखही करण्यात आला नाही.
निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंध बिघडले
ब्रिटीश कोलंबियामध्ये १८ जूनला ४५ वर्षीय खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या गुप्तहेरांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप भारत सरकारने फेटाळून लावले. हा आरोप चुकीचा आणि खोटा असल्याचे भारताने म्हटलं.