डॉ. बाबासाहेबांचा कॅनडात सन्मान, 14 एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:43 PM2021-04-03T17:43:45+5:302021-04-03T17:44:46+5:30
महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 14 एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे
कोलंबिया - भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची येत्या 14 एप्रिलला 130 वी जयंती साजरी होत आहे. केंद्र सरकारने या वर्षीपासून 14 एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कॅनडातील एका प्रांतातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल हा 'समता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे
महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 14 एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे. (The Centre has announced a public holiday on April 14 this year on account of the birth anniversary of Dr BR Ambedkar.) तर, दुसरीकडे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातही 14 एप्रिल रोजी समता दिन साजरा करण्यात येणार आहे. समाजातील जातीव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारत मानवेताल समानतेची वागणूक मिळवून देण्यास डॉ. बाबासाहेबांनी मोठी लढाई लढली. भारतीय संविधानातून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकारही मिळवून दिला. त्यामुळे, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये एक पत्रही जोडलं आहे, त्यानुसार कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात 14 एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा होणार आहे.
Province of British Columbia, Canada has declared April 14, 2021 as Dr. B. R. Ambedkar Equality day to honour him.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
Proud to be a #Ambedkarite#JaiBhimpic.twitter.com/nilNkWe1UL
14 एप्रिल राष्ट्रीय हॉलिडे
डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी 14 एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला?
मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत.
शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा...
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.