भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 07:54 PM2024-10-16T19:54:59+5:302024-10-16T19:55:51+5:30
Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत.
Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडा आणि भारत यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण होताना दिसत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत. ट्रुडो यांनी लावलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर भारतीय परराष्ट्र विभागाने दिले आहे. असे असताना भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टीन ट्रुडो यांना आता कॅनडातूनच धक्का बसला आहे. एकीकडे कॅनडा सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत भारत सरकारने कडक कारवाई केली आहे, तर दुसरीकडे लिबरल पक्षाचे खासदार ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
कॅनडातील शार्लोट टाऊन येथील खासदार शॉन केसी यांनी सीबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रुडो यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या मतदारसंघातील लोकांकडून स्पष्ट संदेश मिळत आहेत की आता ट्रूडो यांच्या गच्छंचीची वेळ आली आहे. मीदेखील त्यांच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
ट्रुडो यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे!
लिबरल पक्षाच्या खासदारांपैकी एक असलेल्या सीन केसी यांनी म्हटले की मी स्पष्टपणे आणि ठणकावून सांगतोय की ट्रूडो यांची जाण्याची वेळ आली आहे. काळाच्या ओघात ही मागणी जोर धरत जाईल. ट्रुडो हे जनतेचे ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. ट्रूडो यांनी गेल्या ९ वर्षांत कॅनडासाठी चांगले काम केले असले तरी आता मतदार ट्रुडोंना पसंत करत नाहीत, असे रोखठोक मतही त्यांनी मांडले.