'या' देशात गांजाचा वापर कायदेशीर होणार, जी-20मधील पहिला देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 02:45 PM2018-06-08T14:45:00+5:302018-06-08T14:48:52+5:30
2001 मध्ये गांजाचा उपयोग औषधासाठी करण्यासाठी संमती देण्यात आली होती
टोरंटो- कॅनडाच्या सिनेटने पास केलेल्या एका विधेयकामुळे तेथे गांजाचा वापर कायदेशीर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. कॅनाबिज अॅक्टला सिनेटर्सनी 56 विरोधात 30 असे संमत करुन हाऊस ऑफ कॉमन्सकडे पाठवले आहे. सिनेटर्सनी या विधेयकाचा सहा महिने अभ्यास केला आहे.
कॅनडाचे तरुण तुर्क पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सत्तेमध्ये आल्यापासूनच गांजाला कायदेशीर ठरवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 2001 साली कॅनडामध्ये गांजाचा उपयोग औषधासाठी करण्यासाठी संमती देण्यात आली होती. आता त्याचा उपयोग इतर कारणांसाठीही (मनोरंजन) करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. जर कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर स्वरुप मिऴाले तर तसे करणारा कॅनडा जी-20 देशांमधला पहिला देश असेल.
आता हे विधेयक हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पाठवले जाईल, त्यावर सिनेटने सुचवलेल्या सुधारणांवर तेथे चर्चा होईल. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी अजून काही महिन्यांचा काळ जाईल असे सांगण्यात येत आहे.
किरकोळ बाजारात गांजाची विक्री, तो कसा विकायचा, सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन याबाबत नियम करण्यासाठी व त्यांचे पालन योग्यरित्या होते की नाही हे पाहाण्याची जबाबदारी प्रांतीय सरकारांकडे असेल. ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस गांजाचा वापर कायदेशीर होण्याची शक्यता आहे.