श्वास थांबला, हृदयाचे ठोके थांबले...मग डॉक्टरांनी केला चमत्कार अन् चिमुकल्याला दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:39 PM2023-02-23T17:39:41+5:302023-02-23T17:40:22+5:30
20 महिन्यांचा चिमुकला तलावात पडला, त्याचे शरीर तरंगत वर आले अन्...
डॉक्टरांना देव म्हटले जाते. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून डॉक्टर वाचवतात. अशाच प्रकारची घटना कॅनडामध्ये घडली, जिथे डॉक्टरांनी एका मृत मुलाचा जीव वाचवून चमत्कार घडवला. गेल्या महिन्यात दिड वर्षांचे बालक तलावात पडले होते, त्याला कोणीही पाहिले नाही आणि तो पाच मिनिटे थंड पाण्यात पडून राहिला होता. त्यानंतर काही अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला पाण्यात तरंगताना पाहिले आणि त्यांनी त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलिया(कॅनडा) येथे 24 जानेवारी रोजी ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ मुलावर उपचार सुरू केला. काही तासांनंतर ते मूल शुद्धीवर आले. डॉक्टरांनी मुलाला किमान तीन तास सीपीआर दिला आणि त्यानंतर मुलाने श्वास घेतला, हे पाहून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.
वेलॉन सॉंडर्स असे या मुलाचे नाव असून, त्याला 6 फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी कौशल्य, जिद्द आणि टीमवर्कमुळेच मुलाचे प्राण वाचल्याचे सांगितले. मुलाचा जीव वाचल्यानंतर त्याच्या घरच्यांनी डॉक्टरांचे आभार मानले तसेच, यापुढे मुलाची काळजी घेणार असल्याचेही म्हटले.