कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पत्नी सोफी लग्नाच्या १८ वर्षानंतर होणार विभक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:10 AM2023-08-03T00:10:44+5:302023-08-03T00:17:31+5:30
५१ वर्षीय जस्टिन ट्रुडो आणि ४८ वर्षीय सोफी यांचा मे २००५ च्या अखेरीस विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत.
टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांनी १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचे ठरविले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी एक निवेदन जारी करून दिली आहे. ५१ वर्षीय जस्टिन ट्रुडो आणि ४८ वर्षीय सोफी यांचा मे २००५ च्या अखेरीस विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत.
जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांनी इन्स्टाग्रामवर एक निवेदन पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "अनेक अर्थपूर्ण आणि कठीण संभाषणानंतर' हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांबद्दल आणि आम्ही जे काही बनविले आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी नितांत प्रेम आणि आदर असलेले एक जवळचे कुटुंब बनले आहे. आमच्या मुलांच्या भल्यासाठी आम्ही तुमच्याकडून आमच्या आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची मागणी करतो".
दुसरीकडे, पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांनी वेगळे होण्याच्या निर्णयासंदर्भात सर्व कायदेशीर आणि नैतिक पावले उचलली आहेत. ते एक जवळचे कुटुंब राहिले आहे. सोफी आणि पंतप्रधान आपल्या मुलांचे सुरक्षित, प्रेमळ आणि आश्वासक वातावरणात संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. पुढील आठवड्यापासून कुटुंब एकत्र सुट्टीवर असणार आहे.
पदावर असताना लग्न मोडणारे जस्टिन ट्रूडो दुसरे पंतप्रधान
जस्टिन ट्रूडो हे कॅनडातील दुसरे पंतप्रधान आहेत, ज्यांनी पदावर असताना पत्नीपासून विभक्त होण्याची घोषणा केली. यापूर्वी, त्यांचे वडील पियरे ट्रूडो हे १९७९ मध्ये पत्नी मार्गारेटपासून विभक्त झाले होते आणि १९८४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, जस्टिन ट्रूडो यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकून त्यांच्या वडिलांची, एक लिबरल आयकॉनची स्टार पॉवर प्रदर्शित केली होती. आठ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर घोटाळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आहे.