चमत्कारच...! तब्बल ३ तासांनी २० महिन्याचा चिमुरडा वेलॉन झाला जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 07:55 AM2023-03-07T07:55:04+5:302023-03-07T08:00:10+5:30
वीस महिन्यांचा, साधारण दीड वर्षाचा एक लहानसा मुलगा. त्याचं नाव वेलॉन सँडर्स. त्याचे आईवडील नोकरी करीत असल्याने त्याला एका पाळणाघरात ठेवण्यात आलं होतं.
वीस महिन्यांचा, साधारण दीड वर्षाचा एक लहानसा मुलगा. त्याचं नाव वेलॉन सँडर्स. त्याचे आईवडील नोकरी करीत असल्याने त्याला एका पाळणाघरात ठेवण्यात आलं होतं. हे पाळणाघर खरोखरच चांगलं होतं आणि तिथे सगळ्याच मुलांवर उत्तम लक्ष ठेवलं जात होतं, मुलांना घरच्यासारखं सांभाळण्याबाबत या पाळणाघराची ख्याती आहे. इथेच हॉलमध्ये वेलॉन खेळत हाेता. खेळता खेळता त्याच्या दुडक्या चालीनं अचानक तो घराबाहेर पडला. जवळच असलेल्या एका बिल्डिंगच्या स्विमिंग टँकजवळ पोहोचला. काही कळायच्या आत तो त्या टँकमध्ये पडला.
दुर्दैव म्हणजे टँकजवळही त्यावेळी कोणीच नव्हतं. त्यामुळे तो पाण्यात पडल्याचं कोणी पाहिलं नाही. मात्र काही मिनिटांतच पाळणाघराच्या लोकांना कळलं, वेलॉन कुठे दिसत नाही. त्यांनी लगेच वेलॉनची शोधाशोध सुरू केली. वेलॉनला हाका मारायला सुरुवात केली. पाळणाघरातला एक जण स्विमिंग टँकच्या दिशेनं पळत गेला. आणि त्याच्या छातीत धस्स झालं! त्याच टँकमध्ये वेलॉन पडलेला होता. वेलॉनला लगेचंच पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
वेलॉन पाण्यात पडून जवळपास पाच मिनिटे होऊन गेली होती. त्याचं शरीर गार पडलं होतं. श्वासोच्छवास पूर्णपणे थांबला होता. काय होऊ शकतं, काय झालेलं असू शकतं, याची पाळणाघरातल्या कर्मचाऱ्यांना कल्पना आली, पण तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. रस्त्यानं जाणाऱ्या एका कारला हात देऊन तत्क्षणी वेलॉनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दरम्यानच्या काळात त्यांनी आणखी तत्परता दाखवून काय घडलं आहे याची हॉस्पिटलच्या डॉक्टरांना फोन करून कल्पना दिली. हॉस्पिटलचे इतर डॉक्टर आणि कर्मचारीही आपल्या हातातलं काम सोडून त्या क्षणी वेलॉनच्या मदतीसाठी सज्ज झाले. वेलॉनला घेऊन कार हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ एकदम तयारीत होता.
कॅनडाच्या पेट्रोलिया शहरातली ही घटना आणि शार्लेट इलिनॉर एंगलेहार्ट हे या हॉस्पिटलचं नाव. लंडनपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर हे शहर आणि हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तसं लहानसंच, तिथे फारशी आधुनिक उपकरणंही नव्हती आणि स्टाफही मर्यादितच होता, पण परिस्थितीच्या गांभीर्याची त्यांना कल्पना आली होती. आपल्यापुढे आता कोणता प्रसंग आलेला आहे, आपल्याला काय काय करावं लागणार आहे, याची त्यांना स्वत:ला तर कल्पना आलीच, पण तेथील मुख्य डॉक्टरांनीही कर्मचाऱ्यांना आपापल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
वेलॉनला हॉस्पिटलमध्ये आणल्याबरोबर डॉक्टरांनी ओळखलं, वेलॉनचा जीव गेलेला आहे. त्याचा श्वासोच्छवास थांबलेला आहे. हृदयाचं धडकणं बंद झालेलं आहे. तरीही त्यांनी अखेरचा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. त्यांनी छोट्या वेलॉनला आळीपाळीनं ‘सीपीआर’ देणं सुरू ठेवलं. ‘सीपीआर’ ही अशी प्रणाली आहे, आणीबाणीच्या स्थितीत, कोणाचा श्वासोच्छवास बंद झाल्यावर, कोणाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, पाण्यात बुडाल्यानंतर या प्रणालीचा वापर केला जातो. वेळीच जर त्या व्यक्तीला सीपीआर देण्यात आला, तर त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.
डॉक्टरांनी वेलॉनलाही सीपीआर देणं सुरू केलं. दरम्यानच्या काळात इतर कर्मचारी, नर्स यांनी वेलॉनाची शक्य ती सारी काळजी घेणं, त्याचं शरीर गरम राहील याची दक्षता घेणं, त्याच्यासाठी दर काही मिनिटांनी गरम पाण्याची व्यवस्था करणं, त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देणं. या साऱ्या गोष्टी अव्याहत सुरू ठेवल्या. हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी किती वेळ वेलॉनला सीपीआर द्यावा? - तब्बल तीन तास ते प्रयत्न करीत होते. शेवटी... त्यांच्या प्रयत्नांना यश आलंच. वेलॉनचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. त्याच्या जिवात पुन्हा जीव आला! वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील ही एक अनोखी घटना मानली जात आहे. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वेलॉनला जीवदान मिळालं! सोशल मीडियावर तर ही घटना अक्षरश: काही तासांतच लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचली. या हाॅस्पिटलची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची जगभरातून वाहवा होत आहे.
‘चमत्कार’च, पण सांघिक मोलही!
वेलॉनचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत होते. त्यांच्या अखंड प्रयत्नांतूनच हा चमत्कार घडून आला. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. टेलर आणि टिजसेन यांचं म्हणणं आहे, खरोखरच हा एक चमत्कार आहे, पण डॉक्टर म्हणून आम्हाला जे करायला हवं होतं, तेच आम्ही केलं. इतर सर्व कर्मचाऱ्यांनीही आम्हाला उत्तम साथ दिली. सांघिक कामगिरीचंच हे फळ आहे. वेलॉनला नवं आयुष्य मिळालं, ही गोष्ट इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.