मुलांचे डोळे ‘जाण्या’आधी जग बघायचंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:58 AM2022-09-27T10:58:44+5:302022-09-27T10:58:52+5:30
या कॅनेडियन जोडप्याला एकूण ४ मुलं आहेत आणि त्यापैकी ३ मुलांची दृष्टी हळूहळू अधू होते आहे. त्यांना झालेल्या आजाराचं स्वरूप असं आहे की काही वर्षांत त्यांची दृष्टी पूर्णपणे जाईल.
सेबॅस्टियन पेलेटियर आणि एडिथ लिमे हे जोडपं त्यांच्या मुलांना घेऊन जगप्रवासाला निघालं आहे. या कॅनेडियन जोडप्याला एकूण ४ मुलं आहेत आणि त्यापैकी ३ मुलांची दृष्टी हळूहळू अधू होते आहे. त्यांना झालेल्या आजाराचं स्वरूप असं आहे की काही वर्षांत त्यांची दृष्टी पूर्णपणे जाईल आणि ते उरलेलं आयुष्य दृष्टिहीन व्यक्ती म्हणून व्यतित करतील. अशावेळी त्यांच्या आई-वडिलांनी काय करावं? हबकून जाणं अगदी स्वाभाविक आहे. त्यांनी अर्थातच मुलांच्या या आजारावर इलाज शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून त्यांना इतकीच माहिती मिळाली की त्यांच्या १२, ७ आणि ५ वर्षं वयाच्या तीन मुलांना रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा एक दुर्मिळ आजार आहे.
या आजारात डोळ्याच्या पडद्याचे स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात आणि त्यामुळे साहजिकच दृष्टीही हळूहळू अधू होत जाते. आता सगळं जग बघू शकणाऱ्या या मुलांची दृष्टी हळूहळू नाहीशी होणार आहे आणि आजघडीला तरी हा आजार बरा करेल असं कुठलंही औषध किंवा उपचार अस्तित्वात नाहीत. हे समजल्यावर सेबॅस्टियन आणि एडिथने ठरवलं की, आपण आपल्या मुलांची दृष्टी शाबूत असताना त्यांना शक्य तेवढं जग दाखवायचं. ते जोवर सगळी दृश्यं उत्तम रीतीने बघू शकताहेत तोवर त्यांना आयुष्यभर सोबत करतील अशा दृश्य आठवणी निर्माण करून द्यायच्या. म्हणूनच ते जगातील सगळ्यात प्रेक्षणीय ठिकाणं बघायला निघाले आहेत.
त्यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात जुलै २०२१ मध्ये पूर्व कॅनडामध्ये केली; मात्र त्यांनी जग फिरण्याच्या प्रवासाला सुरुवात केली, ती २०२२ मध्ये नामिबियापासून ! त्यानंतर ते मंगोलियाला गेले आणि तिथून इंडोनेशियाला गेले. तेव्हापासून हे सहा जणांचं कुटुंब जग फिरायला निघालेलं आहे. सेबॅस्टियन म्हणतो की, ‘घरी राहण्यात आनंद असतोच, पण प्रवास करण्यासारखं श्रेष्ठ इतर काहीही नसतं.’ त्याचबरोबर एडिथ म्हणते की, ‘प्रवास करण्यात मजा तर आहेच; पण मुलांच्या आजाराचं निदान झाल्यामुळे आम्हाला तो प्रवास करण्याची घाई करणं भाग होतं.’
आपल्या मुलांना दिसतंय तोवर शक्य तेवढं जग दाखवायचं एवढाच उद्देश घेऊन प्रवासाला निघालेल्या या कुटुंबात जसे आई-वडील आहेत, तशी त्यांची चार लहान मुलंही आहेत आणि अर्थातच त्या मुलांची या प्रवासात त्यांना काय करायचं आहे याची स्वतःची, स्वतंत्र अशी यादीही आहे. या यादीत काय आहे? तर अर्थातच लहान मुलांचा जसा प्लॅन असावा तसाच त्यांचा प्लॅन आहे. मुलांना घोड्यावर बसायचं आहे आणि उंटाच्या पाठीवर बसून ज्यूस प्यायचा आहे.
मुलांची इतरही काही स्वप्नं असतील आणि त्यांचे आई-वडील त्यापैकी शक्य ती सगळी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील यात काही शंका नाही; पण सेबॅस्टियन म्हणतो की, या प्रवासात त्यांना केवळ इतर ठिकाणंच दिसली नाहीत, तऱ्हेतऱ्हेचे लोकही भेटले. अनेक संस्कृतींशी त्यांची ओळख झाली आणि सगळाच अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता. हे कुटुंब जगभर फिरत असताना दर काही काळाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत असत. त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना ते काय करताहेत हे माहिती असतं. त्याव्यतिरिक्त त्यांचा हा प्रवास डिजिटली फॉलो करणारे त्यांचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्सदेखील हजारोंनी आहेत. तेही या सहा जणांच्या प्रवासाच्या अपडेट्सची वाट बघत असतात.
या जोडप्याने हा प्रवास सुरू केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना एका तज्ज्ञाने दिलेला सल्ला. त्याने या दोघांना सांगितलं की, मुलांना शक्य असतील तेवढे दृश्य अनुभव द्या. त्यांना दृश्य अनुभवांमध्ये गुंतवून ठेवा. आता या वयाच्या मुलांना दृश्य अनुभवांमध्ये कसं गुंतवून ठेवता येईल याचा सर्व बाजूंनी विचार केल्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, शक्य तेवढा प्रवास करणं आणि वेगवेगळी ठिकाणं बघणं हेच त्यावरचं सगळ्यात चांगलं उत्तर आहे. आत्तापर्यंत ६ महिने प्रवास करून झालेलं हे कुटुंब अजून ६ महिने जगभर भटकत फिरणार आहे !
आज आणि आत्ता!
सेबॅस्टियन म्हणतो, ‘या ट्रिपमुळे आमचे अक्षरशः डोळे उघडले. आज आमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्यायला मुलांच्या बरोबरीने आम्हीही शिकलो ! जी माणसं आमच्या आयुष्यात आहेत त्यांची सोबत आम्हाला एन्जॉय करायची आहे.’