कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनाम्याच्या तयारीत; पक्षांतर्गत विरोध वाढल्याने लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:30 IST2025-01-06T09:01:29+5:302025-01-06T10:30:33+5:30

पक्षांतर्गातील विरोधामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच राजीनामा देऊ शकतात

Canadian Prime Minister Justin Trudeau may resign opposition within the party | कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनाम्याच्या तयारीत; पक्षांतर्गत विरोध वाढल्याने लवकरच निर्णय

(फोटो सौजन्य - AP)

Canada PM Justin Trudeau:कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आहे. एक-दोन दिवसांत ट्रुडो राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात, असे म्हटलं आहे. जस्टिन ट्रुडो हे लिबरल पक्षाचे नेतेपदही ते सोडणार आहेत. ट्रुडो यांच्या राजीनाम्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, मात्र राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच तो होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना भारताशी वैर घेणे चांगलेच महागात पडल्याचे म्हटलं जात आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

द ग्लोब अॅण्ड मेलच्या वृत्तानुसार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो बुधवारी नॅशनल कॉकसच्या बैठकीपूर्वी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर करतील.  नॅशनल कॉकसच्या बैठकीत ट्रुडो यांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ट्रूडो हे कॉकसच्या बैठकीपूर्वी त्यांच्या राजीनाम्याबाबत एक निवेदन जारी करतील जेणेकरुन त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यांची हकालपट्टी केलेली नाही असं दिसेल.

मात्र जस्टीन ट्रुडो ताबडतोब पायउतार होतील की नवीन नेता निवडला जाईपर्यंत वाट पाहतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधानपद सोडण्यास इच्छुक आहेत की नाही याबाबत ट्रुडो यांनी अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली. लेब्लँकने ही भूमिका घेणे अव्यवहार्य ठरेल असं जस्टीन ट्रुडो यांना सांगितले. ट्रुडो यांच्या राजीनाम्याचे कारण म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या सर्वेक्षणांमध्ये त्यांचा पक्ष उदारमतवादी कंझर्व्हेटिव्हजकडून पराभूत होताना दिसत आहे.

 

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रुडो यांच्यावरील दबाव खूप वाढला होता. ट्रम्प हे ट्रुडो यांच्यावर निशाणा साधत होते. इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांच्या विजयानंतर लगेचच, आता ट्रूडोंची वेळ आली असल्याचे म्हटलं होतं. जस्टिन ट्रुडो यांनी २०१३ मध्ये लिबरल नेते म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी पक्ष अडचणीत होता आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर घसरला होता.

दरम्यान, कॅनडाच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाचे सध्या १५३ खासदार आहेत. काही महिन्यांपूर्वी ट्रुडो सरकारचा मित्रपक्ष असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. एनडीपी हा खलिस्तान समर्थक कॅनडाचे शीख खासदार जगमीत सिंग यांचा पक्ष आहे. त्यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत ट्रूडोंच्या पक्षाला दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे ट्रूडो यांचे सरकार वाचले होते.

Web Title: Canadian Prime Minister Justin Trudeau may resign opposition within the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.