डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी पाठवलं होतं विषारी पत्र; आता महिलेला भोगावा लागणार २२ वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:50 PM2023-08-18T15:50:38+5:302023-08-18T15:51:20+5:30
न्यायालयाचे न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरीयरला सांगितले की, तुमची कृती तुमच्यासाठी आणि समाजासाठी हानिकारक आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विषारी पत्र पाठवणाऱ्या एका महिलेला न्यायालयाने २२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पास्केल फेरियर असे या शिक्षा सुनावलेल्या दोषी महिलेचे नाव आहे. पास्केल फेरियर हिने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी एक पत्र पाठविले होते. या पत्रात तिने विष वापरले होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पास्केल फेरियरची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिला अमेरिकेतून हद्दपार केले जाईल. यावेळी न्यायालयाचे न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरीयरला सांगितले की, तुमची कृती तुमच्यासाठी आणि समाजासाठी हानिकारक आहे.
दोषी पास्केल फेरियरकडे फ्रान्स आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. पास्केल फेरियरने न्यायालयात योजना अयशस्वी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच, न्यायालयाला दिलेल्या प्रदीर्घ भाषणात तिने असेही म्हटले की, ती स्वतःला दहशतवादी म्हणून पाहत नाही तर एक कार्यकर्ता म्हणून पाहते. "मला माझे ध्येय साध्य करण्यासाठी शांततापूर्ण मार्ग शोधायचे आहेत", असे पास्केल फेरियर म्हणाली. न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरियरला २२ वर्षांपेक्षा कमी म्हणजे २६२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, एफबीआयला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर पास्केल फेरियरच्या बोटांचे ठसे सापडले होते.
सप्टेंबर २०२० मध्ये न्यूयॉर्क सीमा ओलांडताना पास्केल फेरियरला अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्याजवळ बंदूक, चाकू आणि दारूगोळा होता. नंतर पास्केल फेरियरने क्युबेक येथील घरी रायसिन व एरंडाच्या बियांच्या घटकांपासून बनवलेले विष पत्रासह लिफाफ्यात ठेवल्याचे कबूल केले. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, या विषामुळे ३६ ते ७२ तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो. हे डोसवर अवलंबून असते. दरम्यान, २०१४ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि इतर अधिकार्यांना रायसिन युक्त पत्रे पाठवल्यामुळे मिसिसिपीच्या एका व्यक्तीला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.