अपघातग्रस्त फुकुशिमा अणुप्रकल्पाच्या कर्मचा-याला किरणोत्सारामुळे झाला कर्करोग
By admin | Published: October 20, 2015 02:22 PM2015-10-20T14:22:06+5:302015-10-20T14:22:06+5:30
फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पामध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचा-याला किरणोत्साराच्या संसर्गामुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. २० - फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पामध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचा-याला किरणोत्साराच्या संसर्गामुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. चार वर्षांपूर्वी अत्यंत दुर्दैवी असा अपघात फुकुशिमा प्रकल्पात झाला होता आणि त्या घटनेनंतर आढळलेला हा पहिला कर्करोगाचा रुग्ण आहे. विशेष म्हणजे अणुउर्जा प्रकल्प सुरक्षित आहेत की नाही यावर जगभरात चर्चा घडत असताना आणि जैतापूरचा अणुउर्जा प्रकल्प वादाच्या भोव-यात सापडलेला असताना ही घटना पुन्हा वाद विवाद निर्माण करण्याची शक्यता आहे.
जपानच्या आरोग्य खात्याच्या अधिका-यांनी सांगितले की, २०११ मध्ये ज्यावेळी फुकुशिमा प्रकल्पात अपघात झाला त्यावेळी तथे कामाला असलेल्या कर्मचा-याला ल्युकेमिया झाल्याचे निष्पन्न झाले असून सध्या त्याचे वय अवघे ४१ आहे. त्या अपघाताशी या कर्मचा-याच्या कर्करोगाचा संबंध असल्याचा निष्कर्षही जपानच्या अधिका-यांनी काढला आहे. या कर्मचा-याला नुकसानभरपाई तसेच वैद्यकीय खर्च देण्यात येणार आहे. या अपघातानंतर आणखी तीन कर्मचारी आजारी पडल्याच्या घटना असल्या तरी त्यांना अजून किरणोत्साराशी संसर्ग आल्यामुळे आजार जडलाय का हे निश्चित झालेले नाही.
फुकुशिमा येथील अपघातामुळे प्रकल्पातील कर्मचा-यांना आणि परीसरातील रहीवाशांना मोठ्या प्रमाणावर कर्करोग होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, ती खरी ठरते की काय अशी चर्चा झडायला सुरूवात झाली आहे.