खुशखबर! कॅन्सरवरील लस तयार, रशियाने केला वैद्यकीय शास्त्रातील पराक्रम, मोफत देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:26 IST2024-12-18T09:26:23+5:302024-12-18T09:26:51+5:30
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की त्यांनी कर्करोगाची लस विकसित केली आहे, ते आपल्या नागरिकांना मोफत देणार आहेत.

खुशखबर! कॅन्सरवरील लस तयार, रशियाने केला वैद्यकीय शास्त्रातील पराक्रम, मोफत देणार
कॅन्सरच्या रुग्णांना आता रशियाने आनंदाची बातमी दिली आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याची माहिती रशियाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. रशियातील नागरिकांसाठी ही लस मोफत असणार आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी सांगितले की, ही लस २०२५ च्या सुरुवातीला लाँच केली जाणार आहे.
अहवालानुसार, ही लस कॅन्सरच्या रुग्णांच्या उपचारासाठी असेल. या लसीचा वापर ट्यूमरची निर्मिती रोखण्यासाठी केला जाणार नाही. रशियन शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या विधानांमध्ये असे सूचित होते की, प्रत्येक लस वैयक्तिक रुग्णांसाठी तयार केली जाईल, पाश्चात्य देशांमध्ये विकसित केल्या जात असलेल्या कर्करोगाच्या लसींप्रमाणेच असेल.
ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर या लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
गेल्या काही वर्षापासून रशियात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. २०२२ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांची ६३५,००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली. कोलन, स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग रशियामध्ये सर्वात सामान्य असल्याचे म्हटले जाते.
कर्करोगाच्या लसींमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला रुग्णाच्या कर्करोगासाठी विशिष्ट प्रथिने ओळखणे आणि त्यांना प्रतिसाद देणे शिकवणे समाविष्ट असते. यासाठी, लसींमध्ये रुग्णाच्या ट्यूमरपासून आरएनए नावाच्या अनुवांशिक सामग्रीचा वापर केला जातो.
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की, त्यांच्या देशातील शास्त्रज्ञ कर्करोगाच्या लसीवर काम करत आहेत आणि ते अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही कर्करोगावरील लस आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ आहोत, असंही ते म्हणाले होते.
इतर देशांनी त्यांच्या स्वतःच्या कर्करोगावरील लस विकसित करण्यावर काम केले आहे. यापूर्वी मे महिन्यात फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी चार रुग्णांवर वैयक्तिक लसीची चाचणी केली होती.