‘मोन्सॅन्टो’ला आव्हान देणारे कॅरास्को कालवश
By admin | Published: May 12, 2014 12:33 AM2014-05-12T00:33:06+5:302014-05-12T00:33:06+5:30
जगात सर्वाधिक वापर होणार्या तणनाशकाच्या पुनर्चाचणीसाठी कीटकनाशक नियामकांना आव्हान देणारे अर्जेन्टिनाचे शास्त्रज्ञ डॉ. आंद्रेस कॅरास्को यांचे निधन झाले.
ब्यूनस आयर्स : जगात सर्वाधिक वापर होणार्या तणनाशकाच्या पुनर्चाचणीसाठी कीटकनाशक नियामकांना आव्हान देणारे अर्जेन्टिनाचे शास्त्रज्ञ डॉ. आंद्रेस कॅरास्को यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अर्जेन्टिनाच्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेने कॅरास्को यांच्या मृत्यूची घोषणा केली. कॅरास्को ब्यूनस आयर्स विद्यापीठात आण्विक जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांचे संशोधन कार्य हे न्यूरोट्रान्समीटर पृष्ठवंशी प्राण्यांताल आनुवंशिक क्रियांना कशाप्रकारे प्रभावित करते यावर केंद्रित होते. त्यांच्या संशोधन कार्याने नंतर अमेरिकेची कंपनी मोन्सॅन्टोसमोर एक मोठे आव्हान निर्माण केले होते. २०१० मध्ये त्यांनी ग्लिम्फोसेटवर केलेल्या संशोधनानंतर वाद निर्माण झाला. ग्लिम्फोसेट मोन्सॅन्टोच्या राऊंटअप बॅ्रण्ड कीटकनाशकांतील महत्त्वाचा घटक असून तो जनुकीय बदलाच्या राऊंड अप-रेडी रोपांसोबत एकत्र बनविण्यात आलेला आहे. योग्यरीतीने वापर केल्यास ही कीटकनाशके सुरक्षित असल्याचे अमेरिकी पर्यावरण संरक्षण संघटना व इतर नियामकांनी प्रमाणित केले होते. मात्र, अर्जेन्टिनात जनुकीय बदलाच्या पिकांच्या वापरास मंजुरी मिळाल्यानंतर अर्जेन्टिनातील कृषी कुटुंबातील बालकांत जन्मदोषांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले. त्यानंतर कॅरास्को यांनी ग्लिम्फोसेटचा बेडूक, कोंबड्याच्या भ्रूणांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करून हे रसायन शेतात काम करणार्या कुटुंबांसाठी धोक्याचीच घंटा असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यांच्या या संशोधनाने मोन्सॅन्टोची झोप उडाली होती. (वृत्तसंस्था)