सौरमंडळाबाहेर आढळला कार्बनडाय ऑक्साइड, नासाचे संशोधन; जगातील अशा प्रकारचा पहिलाच शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:41 AM2022-08-29T07:41:38+5:302022-08-29T07:42:11+5:30
NASA Research: नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बिणीने आपल्या सौरमंडळाच्या बाहेरील एका ग्रहावर कार्बनडाय ऑक्साइडचे अस्तित्व असल्याचा शोध लावला आहे
वॉशिंग्टन : नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बिणीने आपल्या सौरमंडळाच्या बाहेरील एका ग्रहावर कार्बनडाय ऑक्साइडचे अस्तित्व असल्याचा शोध लावला आहे. अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच शोध आहे. नवा ग्रह गुरू ग्रहापेक्षा आकाराने मोठा असून, सूर्यासारख्याच एका ताऱ्याभोवती भ्रमण करीत आहे.
यासंदर्भात नेचर जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. कार्बनडाय ऑक्साइडचे अस्तित्व आढळलेल्या ग्रहाला डब्ल्यूएएसपी-३९बी असे नाव देण्यात आले. तो पृथ्वीपासून ७०० प्रकाश वर्षे दूर अंतरावर आहे. नव्या ग्रहाचा व्यास गुरू ग्रहापेक्षा १.३ पट अधिक आहे.
डब्ल्यूएएसपी-३९बी या ग्रहावर तापमान ९०० अंश सेल्सिअस आहे. आपल्या जवळच्या ताऱ्याभोवती तो ग्रह अशा गतीने भ्रमण करतो की त्यावरील एक वर्ष हे आपल्या चार दिवसांच्या कालावधीइतके असते. या नव्या ग्रहाचा २०११ साली शास्त्रज्ञांनी शोध लावला होता; पण त्याचे अतिशय छायाचित्र आता उपलब्ध झाले. ११ वर्षांपूर्वी या ग्रहाचे अस्तित्व शोधण्यात आले होते. त्याशिवाय हबल दुर्बीण व स्पिट्जर अंतरिक्ष दुर्बिणीने डब्ल्यूएएसपी-३९बी या ग्रहाची धूसर छायाचित्रे टिपली होती. डब्ल्यूएएसपी-३९बी ग्रहावर कार्बनडाय ऑक्साइड वायूचे अस्तित्व आहे याचा शोध नासाच्या जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बिणीमुळे लागला. (वृत्तसंस्था)