अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:22 PM2024-11-19T15:22:06+5:302024-11-19T15:22:41+5:30
या गाजरांना E. coli बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
E. coli: जर तुम्ही गाजराची भाजी खात असाल किंवा सॅलडमध्ये गाजर खायला आवडत असेल तर तुम्ही सावध व्हा. कारण, गाजर खाल्याने अमेरिकेत अनेक लोक आजारी पडले आहेत. संक्रमित गाजर खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करत ग्रिमवे फार्म्सने अनेक राज्यांमध्ये पाठवलेले सेंद्रिय आणि लहान गाजर परत मागवले आहेत. या गाजरांना E. coli बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
अमेरिकेतली सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने(सीडीसी) सांगितले की, आतापर्यंत १५ लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि १८ राज्यांमधून गाजर खाल्ल्याने ३९ लोकांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गाजर ग्रिमवे फार्म्सने मोठ्या सुपरमार्केटमध्ये विकले होते. यामध्ये ट्रेडर जोस, होल फूड्स ३६५, टारगेट्स गुड अँड गेदर, वॉलमार्ट्स मार्केटसाइड, वेगमॅन्सचा समावेश आहे.
या प्रकरणी ग्रिमवे फार्म्सचे म्हणणे आहे की, त्यांनी पिकवलेल्या गाजरांना E. coli बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. यापासून लहान मुले, वृद्ध लोक आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. या संसर्गातून बरं होण्यासाठी अनेकदा लोकांना २४ तास ते १० दिवस लागतात.
सीडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित संक्रमित गाजर यापुढे कोणत्याही दुकानात नसतील, परंतु ते घरांमध्ये साठवले जाण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत ही गाजर फेकून द्यावीत किंवा स्टोअरमध्ये परत केली जावी जेणेकरून त्यांचे पैसे परत मिळू शकतील. तर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गाजर खाल्ल्याने संसर्ग झालेले बहुतेक लोक न्यूयॉर्क, मिनेसोटा आणि वॉशिंग्टनचे रहिवासी आहेत. याशिवाय कॅलिफोर्निया आणि ओरेगॉनमध्येही गाजर खाल्ल्याने लोक आजारी पडले आहेत.
सीडीसी म्हणणे आहे की, परत मागवलेल्या सर्व गाजरांवर एक्सपायरी डेट देण्यात आली नाही. परंतु तरीही ते १४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या कालावधीत खरेदी करण्यात आलेले असेल. ११ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत वापरलेले लहान गाजर देखील परत मागवण्यात आले आहेत, असे सीडीसीने सांगितले. याचबरोबर, सीडीसीने म्हटले आहे की गाजरांच्या संपर्कात येणारी सर्व ठिकाणे स्वच्छ करावीत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक कोणत्याही उपचाराशिवाय बरे होतात, परंतु काही लोकांना किडनीचा गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
E. coli ची लक्षणे कोणती?
पोटात दुखणे, जुलाब आणि उलट्या होणे, अशी E. coli ची लक्षणे आहेत. हा संसर्ग पोटात गेल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ही लक्षणे दिसून येतात.