पाळीव पोपटामुळे आले नवऱ्याचे ‘प्रकरण’ उघडकीस!
By admin | Published: October 27, 2016 02:30 AM2016-10-27T02:30:56+5:302016-10-27T02:30:56+5:30
पाळीव पोपट ऐकलेले, शिकविलेले जसेच्या तसे हुबेहूब बोलतो, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. अशा ‘पोपटपंची’चे कोडकौतुकही केले जाते, पण अशाच पोपटपंचीमुळे
दुबई : पाळीव पोपट ऐकलेले, शिकविलेले जसेच्या तसे हुबेहूब बोलतो, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. अशा ‘पोपटपंची’चे कोडकौतुकही केले जाते, पण अशाच पोपटपंचीमुळे कुवेतमधील एका पतीचे घरातील मोलकरणीशी असलेले प्रेमसंबंध त्याच्या पत्नीला कळल्याने, या नवरोबांची मोठी पंचाईत झाली.
‘अरब न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पाळीव पोपटामुळे वैवाहिक संबंधात बिब्बा घातला गेलेल्या या दाम्पत्यातील पती व पत्नी दोघेही नोकरी करतात. एक दिवस पत्नी लवकर घरी आली, तेव्हा तिला पोपटाचे बोलणे नेहमीपेक्षा वेगळे जाणवले. नीट लक्षपूर्वक अनेक वेळा ऐकल्यावर तिच्या लक्षात आले की, तो पोपट तिचा पती आणि त्यांची मोलकरीण यांच्यातील ‘प्रेमसंवाद’ बोलत होता. पतीच्या वागण्यावर तिला आधीपासून संशय होताच. पोपटपंचीने त्याला बळकटी मिळाली. पती घरी आला आणि पत्नीला लवकर घरी आलेले पाहून तो भांबावून गेला. दोघांमध्ये खूप खडाजंगी झाली. पत्नीने पोपटाला बोलायला सांगून ते आक्षेपार्ह प्रेमसंवाद पतीला पुन्हा-पुन्हा ऐकविले, पण पती काही केल्या कबूल झाला नाही.
संतापलेली पत्नी तडक कुवेतमधील हवाली पोलीस ठाण्यात गेली आणि तिने पतीविरुद्ध फसवणूक आणि व्यभिचाराची फिर्याद नोंदविली, परंतु यातून पतीविरुद्ध व्यभिचाराचा खटला दाखल करून तो सबळ पुराव्याने सिद्ध करणे शक्य नसल्याचे मत प्रॉसिक्युटरने दिल्याने हे नवरोबा कायद्याच्या कचाट्यातून मात्र बचावले! कुवैतमध्ये विवाहबाह्यसंबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा असून, तो
सिद्ध झाल्यास, व्यभिचाऱ्याबद्दल सश्रम कारावासही होऊ
शकतो. (वृत्तसंस्था)
पोपट कोणाकडून शिकला?
‘अरब टाइम्स’च्या वृत्तानुसार पाळीव पोपटाची ही ‘गद्दारी’ पतीच्या अंगलट आली खरी, पण कायद्याच्या कचाट्यातून मात्र तो थोडक्यात बचावला. याचे कारण असे की, पत्नीने तिच्या फिर्यादीत लिहिलेले सर्व खरे मानले, तरी पोपटाचे बोलणे हा पतीविरुद्ध व्यभिचाराचा गुन्हा नोंदवून खटला चालविण्यास विश्वासार्ह आणि ठोस असा पुरावा होऊ शकत नाही, असे प्रॉसिक्युटरचे मत पडले. प्रॉसिक्युटरच्या म्हणण्यानुसार, कदाचित ते प्रेमसंवाद टीव्ही किंवा रेडिओवर ऐकूनही पोपट बोलायला शिकला असेल!
पोपटपंची भोवली...
पोपटाचे बोलणे नेहमीपेक्षा वेगळे जाणवले. नीट लक्षपूर्वक अनेक वेळा ऐकल्यावर तिच्या लक्षात आले की, तो पोपट तिचा पती आणि त्यांची मोलकरीण यांच्यातील ‘प्रेमसंवाद’ बोलत होता. पोपटपंचीने पतीच्या वागण्यावरील संशयाला बळकटी मिळाली.