टोळ विका अन् पैसे कमवा; पाकिस्तान सरकारची अजब-गजब ऑफर, देशभर राबवणार योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 02:57 PM2020-06-04T14:57:02+5:302020-06-04T14:59:01+5:30
या टोळांना पकडून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे.
इस्लामाबाद - टोळ हल्ल्यापासून फक्त पाकिस्तानच नव्हे तर भारतातही बर्याच राज्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अलीकडेच पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या टोळांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पिकांना लक्ष्य केले आहे. टोळांच्या या हल्ल्याने शेतकरी चिंतेत असताना पाकिस्तान सरकारने त्यातून कमावण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.
या टोळांना पकडून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे. त्यासाठी टोळ किड्यांना पकडण्याचं आवाहन पाकिस्तान सरकारने केले आहे. पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, टोळ पकडण्यासाठी देशव्यापी पायलट प्रकल्प तयार करणार आहोत, यात टोळांना पकडून देणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. या योजनेमुळे देशातील काही गरीब भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल असा दावा करत पकडलेल्या टोळांपासून पॉल्टी फार्मसाठी प्रथिनेयुक्त चारा बनवला जाईल असं त्यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानचे मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्नधान्याचं संकट असल्यामुळे टोळांना पकडून विकण्याची योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट पंजाब प्रांतातील ओकरा येथे लागू करणार आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी २० रुपये किलो या भावाने पैसे दिले जाणार आहेत.
या टोळांच्या हल्ल्याने पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. याखेरीज या हल्ल्यांमुळे पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या बर्याच देशांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. टोळांची धाड यापुढे इराण आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांवर हल्ला करेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. वाळवंटातील टोळ हे समूहात असताना त्यांचे वर्तन बदलतात. टोळ एका तासामध्ये १६ ते १९ किमी अंतर अंतर करू शकतात. वाऱ्यामुळे ते आणखी दूर जाऊ शकतात. एक किलोमीटर टोळाच्या समुहात सुमारे ४ कोटी टोळ असतात. एका दिवसात ३५ हजार लोक जेवतील इतकी ते पिक खातात.
ओमानच्या वाळवंटात जोरदार पाऊस पडल्यानंतर टोळ तयार होतात. हिंद महासागराच्या चक्रीवादळामुळे वाळवंटातही पाऊस पडला आहे, त्यामुळे टोळ देखील तयार झाले आहेत. एप्रिल महिन्यात भारतात राजस्थानमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
.तर ‘त्यांना’ दीड लाखांचे बक्षीस देणार; हत्तीणीच्या मृत्यूनंतर वन्यप्राणी संघटनेचं आवाहन
तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही नाही; बुडणाऱ्या माणसाला पाहून हत्तीच्या पिल्लानं काय केलं? पाहा
संपत्तीच्या हवास्यापोटी सुपारी देऊन पोटच्या मुलानंच केली बापाची हत्या, तर सुनेनं...
कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ
कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...