भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 06:04 AM2021-01-10T06:04:02+5:302021-01-10T06:04:17+5:30
पूर्व लडाखमधील घटना; भरकटल्याने हद्दीत आल्याचा त्या सैनिकाचा दावा
लडाख : भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम असतानाच पूर्व लडाखमध्ये चुशूल विभागातील गुरंग खोऱ्याजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. दिशा भरकटल्याने आपण भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या सैनिकाने केला आहे. सध्या याची चौकशी सुरू असून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच त्याला चीनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
भारतीय लष्कराने माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला पकडण्यात आले आहे.
पूर्व लडाखमध्ये मागच्या वर्षीपासून दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे. दोन्ही देशांचे सैन्य सध्या समोरासमोर उभे आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने तसेच अत्याधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी याच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पडल्या परंतु सीमावादातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आक्रमक चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर तोडीस तोड उत्तर दिले आहे. (वृत्तसंस्था)
चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ पर्यंत परतणार
नवी दिल्ली : चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ जानेवारीपर्यंत भारतात परतणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. मालवाहू जहाज एमव्ही जग आनंद जपानच्या चिबाकडे कूच करणार आहे. बंदरे व जहाजबांधणी राज्यमंत्र्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये आमचे नाविक अडकलेले आहेत. एमव्ही जग आनंद या जहाजावर ते आहेत. चालक दलात बदल करण्यासाठी चिबा, जपानकडे ते जहाज प्रवास सुरू करणार आहे.
भारतीय नाविक दलाचे दोन मालवाहू जहाज अनेक महिन्यांपासून चिनी जलक्षेत्रात उभे आहेत. इतर काही जहाजांनी त्यांचा माल उतरवला असला तरी या जहाजांना माल उतरण्याची परवानगी दिली जात नाही. चीनने २५ डिसेंबर रोजी म्हटले होते की, भारत-चीनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे चीनच्या बंदरांवर भारतीय नाविक अडकलेले नाहीत. विदेश मंत्रालयाने म्हटले होते की, दोन मालवाहू जहाज चिनी जलक्षेत्रात अडकले असून, त्यावर ३९ भारतीय नाविक आहेत.
काय म्हणाले विदेश मंत्रालय?
विदेश मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते की, या स्थितीत नाविक खूपच तणावात आहेत. या संकटाच्या काळात ग्रेट ईस्टर्न शिपींग कंपनीचा मानवीय दृष्टीकोन व संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी म्हटले होते की, चीनमध्ये अडकलेल्या नाविकांना लवकरच परत आणले जाईल.