आर्मस्ट्राँग चंद्रावर जिथे उतरला तिथून ४०० किमी अंतरावर सापडली गुहा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:25 AM2024-07-16T10:25:33+5:302024-07-16T10:27:32+5:30
इटलीच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी हे जाहीर केले. आर्मस्ट्राँग, ऑल्ड्रिनला घेऊन अपोलो ११ हे अमेरिकेचे अवकाशयान चंद्रावर जिथे उतरले होते.
केप कार्निव्हल : चंद्रावर गुहा असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. ५५ वर्षांपूर्वी अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग व बझ ऑल्ड्रिन चंद्रावर जिथे उतरले होते, त्या जागेपासून ही गुहा ४०० किमी इतक्या अंतरावर आहे. अशा शेकडो गुहा चंद्रावर असाव्यात, भविष्यात चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना या गुहांमध्ये वास्तव्य करता येईल, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
इटलीच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी हे जाहीर केले. आर्मस्ट्राँग, ऑल्ड्रिनला घेऊन अपोलो ११ हे अमेरिकेचे अवकाशयान चंद्रावर जिथे उतरले होते, त्या जागेपासून शेकडो किमी दूर असलेल्या सी ऑफ ट्रान्क्विलिटी या भागात ही गुहा असल्याचे आढळून आले आहे. त्या भागात लाव्हारसामुळे २००पेक्षा अधिक विवरे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या भागाच्या रडार मोजमापांचे संशोधकांनी नासाच्या ल्युनार रिकनेसान्स ऑर्बिटर या उपकरणाद्वारे विश्लेषण केले. चंद्राच्या या भागावरील गोष्टींची तुलना पृथ्वीवर तशाच प्रकारच्या असलेल्या प्रदेशाशी केली. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर ॲस्ट्रॉनॉमी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.