वसंत ऋतूत 'चेरी ब्लॉसम' बहरला; वॉशिंग्टनमध्ये 'चैत्रगौरी'चा सोहळा रंगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 09:56 AM2022-04-10T09:56:11+5:302022-04-10T09:57:42+5:30

सगळ्या सणांना जरी मायदेशी आपल्या माहेरी जाता आले नाही तरी, फार उत्साहाने अमेरिकेतील मराठी बायका आपली संस्कृती टिकवून आहेत आणि मोठ्या प्रमाणात सगळे सण साजरे करतात.

Chaitra Gauri Haldi Kunku in Washington D C | वसंत ऋतूत 'चेरी ब्लॉसम' बहरला; वॉशिंग्टनमध्ये 'चैत्रगौरी'चा सोहळा रंगला!

वसंत ऋतूत 'चेरी ब्लॉसम' बहरला; वॉशिंग्टनमध्ये 'चैत्रगौरी'चा सोहळा रंगला!

googlenewsNext

चैत्र महिना म्हणजे वसंतोत्सव. झाडा-वेलींवर येणारी पोपटी पालवी, जवळूनच ऐकू येणारी पक्षांची किलबिल. सगळा निसर्ग आपले नवरंग, नवचैतन्य फुलवत जणू नव्या सृष्टीसाठी तयार होत असतो. चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला केल्या जाणा-या गौरीचे पूजन म्हणजेच 'चैत्रगौरी'. चैत्रपाडवा वा गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवसापासून हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो व अक्षय्य तृतीयेला या उत्सवाची सांगता होते. चैत्रपालवीप्रमाणे फुलून स्त्रीमनाला आलेल्या बहरानिमित्त, आपल्या सौभाग्याचं अधिष्ठान असलेल्या हळदीकुंकवाचं लेणं देऊन, स्त्रिया हा सण साजरा करतात. 

अमेरिकेतही चैत्र महिन्यात सगळीकडे चैत्रपालवी फुललेली असते. अमेरिकेतील वॉशिंग्टन डिसी मध्ये तर चेरी ब्लॉसम याच काळात बहरलेला असतो. मग अमेरिकेतील मराठी महिला चैत्र गौरी साजरी करण्यात का बरं मागे राहतील? सगळ्या सणांना जरी मायदेशी आपल्या माहेरी जाता आले नाही तरी, फार उत्साहाने अमेरिकेतील मराठी बायका आपली संस्कृती टिकवून आहेत आणि मोठ्या प्रमाणात सगळे सण साजरे करतात. मेरीलँड मधील क्लार्क्सबर्ग गावातील प्रिया जोशी, दीपा शेटे आणि शुभांगी वानखेडे या तीन मैत्रिणींनी चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाचा घाट घातला. गुढी पाडव्याला शनिवार हा सुट्टीचा वार असल्याने त्याच दिवशी निवांतपणे हळदीकुंकू करण्याचे निश्चित झाले. व्हॉट्सएप ग्रुप तयार केला गेला आणि तयारीला सुरुवात झाली!  जेवणाचा बेत ठरला, कार्यक्रमात काय सादर करणार आहेत, ड्रेस कोड काय असेल याच्या सगळ्या सूचना त्यात देण्यात आल्या. आपल्या २०-३० मैत्रिणींना बोलावून अगदी पारंपरिक रीतीने हळदी कुंकू पार पडले. 

घर झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले होते. भारताप्रमाणेच इथेही पितळी पाळण्यात अन्नपूर्णेला बसवून तिला वस्त्रालंकार घातले होते. झेंडू, शेवंती, निशिगंधाच्या फुलांनी सजवले होते. तिच्या भोवती छान आरास मांडली होती. कैरीची डाळ, पन्हे आणि सुग्रास जेवणाचा नैवेद्य दाखवला होता.  सगळ्या मैत्रिणी ठरवून पैठणी, नथ, मराठी दागदागिने घालून जणू गौरीचे रूप घेऊनच सजल्या होत्या. सगळ्यांना आल्या आल्या कैरीचे पन्हे, आंब्याची डाळ आणि ओले हरबरे दिले गेले. हास्याच्या आणि गप्पांच्या फैरी झडत होत्या. 

प्रियाने करोनाचे सावट दूर होऊन असंच सगळे पूर्ववत होऊ दे, असं देवीकडे साकडं घातलं. सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झाल्यावर देवीसमोर एक सुंदर कार्यक्रम सादर केला. सगळ्यांनी आपली ओळख दिल्यावर सुंदर उखाणे घेतले. 

कार्यक्रमाची संचालिका प्राजक्ता सप्रे होती. तिने चैत्रगौरी का साजरा करतात याची तिच्या आजीकडून ऐकलेली गोष्ट सांगितली. एकदा शिव पार्वती सारीपाट खेळताना पार्वतीचा विजय झाला. पार्वती जिंकली हे पाहून शिव नाराज झाले आणि म्हणाले की तू नेहमी मला अपमानित करतेस! ते ऐकून पार्वती रुसून दूर अरण्यात निघून गेली.  शंकर तिला शोधायला जाताना वसंत ऋतू आणि गंधर्व यांना घेऊन गेले.  त्यामुळे चैत्रपालवीने सजलेल्या अरण्यात पार्वती दिसली.  शंकराने तिला रिझवून फुलापानांनी सजलेल्या झोपाळ्यावर बसून झोके दिले. मग पार्वती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना सुख समृद्धीचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून चैत्रात चैत्रगौरीचे आवाहन करतात. 

जय शारदे वागेश्वरी ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली.  काहींनी कविता सादर केल्या तर काहींनी लावणी, गाणी तर काहींनी उभ्या उभ्या विनोद.. असा रंगतदार कार्यक्रम साजरा झाला.  त्यामुळे नुसत्याच गप्पा मारण्यापेक्षा मैत्रिणींनी आपले कलागुण सादर करून देवीला जणू कलेचे अर्घ्य अर्पण केले. सगळ्या मैत्रिणींनी एकमेकांना अगदी समरसून दाद दिली.  कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून फोटो काढले गेले.  

त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. एकावर भार पडू नये म्हणून सगळ्या मैत्रिणींनी एक-एक पदार्थ घरी बनवून आणला होता.  जेवणाचा बेत आखताना ताटातली डावी-उजवी बाजू, पंच पक्वान्न, इत्यादी काय असावीत याचा विचार केला गेला होता.  श्रीखंड-पुरी, पुरण पोळी, गुलाबजाम, शीरा, खीर ही पंचपक्वान्ने होती.  बटाटा भाजी, रस्सा, भरली वांगी, मसूर उसळ, टोमॅटो सार, सोलकढी, मसाले भात, वरण भात असा जय्यत बेत ठरवला होता.  लोणची, चटणी, पंचामृत आणि कोशिंबीरीने पानाची डावी बाजू सजवली होती.  कोथिंबीर वडी, बटाटा वडा, पापड कुरडई असे चमचमीत पदार्थही होते. या सगळ्याच्या देवीला नैवेद्य दाखवला गेला आणि मगच सगळ्यांनी जेवायला घेतले. परत सगळ्यांच्या गप्पांचा फड रंगला.  मग सगळ्यांना वाण देऊन या हळदी कुंकवाची सांगता झाली. सगळ्या तृप्त मनाने घरी गेल्या.  

आपल्या परंपरेत हळदीकुंकवाचे प्रयोजनच बायकांना एकमेकांना भेटून रोजच्या जगरहाटीचा शिणवटा घालवून आनंदाने एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी केले आहे. आम्ही माहेरवाशिणी जरी नसलो तरी सगळ्या नव्या जुन्या मैत्रिणींना भेटून चार क्षण मजेत घालवले. अशा या क्षणांनीच मनाला परत उभारी मिळते, म्हणजे ही एक प्रकारची सायको थेरपीच आहे की! आपल्या पूर्वजांनी किती विचार करून घडवल्या आहेत या रूढी आणि प्रथा! याची प्रचिती त्या संध्याकाळी आम्हा सगळ्या ललनांना आली. शेवटी काय आहे.. मायदेशाशी जोडलेली नाळ तुटू नये, आपली परंपरा साता समुद्रापार जपावी हेच प्रत्येकीला वाटत असते. एक संध्याकाळ उत्तम कारणी लागली!  

लेखिका: सौ. सुजाता देशमुख 

Web Title: Chaitra Gauri Haldi Kunku in Washington D C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.