अमेरिकेत आता आंदोलकांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:51 AM2020-04-29T04:51:58+5:302020-04-29T04:52:18+5:30
कोरोनाच्या शटडाऊनमुळे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.
न्यूयॉर्क : अमेरिका एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना देशाच्या काही भागात आंदोलकांचे आव्हान उभे ठाकले आहे. कोरोनाच्या शटडाऊनमुळे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.
राजधानीतील आंदोलनकर्त्यांचे आयोजक टेलर मिलर म्हणाले की, सर्व व्यवहार बंद करुन लोकांना घरात राहण्याचा आदेश देऊन राज्याच्या गव्हर्नर यांनी आमचे संवैधानिक अधिकार नाकारले आहेत. मार्चच्या मध्यात वॉशिंग्टनचे गव्हर्नर जेय इनस्ली यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य ठिकाणांप्रमाणेच या राज्यातही आणीबाणी जाहीर केली होती. या आदेशानुसार, रेस्टॉरंट आणि बार बंद करण्यात आले होते. कोणत्याही ठिकाणी अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आंदोलकांना हे मान्य नाही.
मिलर यांचे असे म्हणणे आहे की, राज्याचे संविधान असे सांगते की, शांततेने एका जागी एकत्र येण्याचा अधिकार कधीही काढून घेतला जाऊ शकत नाही. ही अमेरिकी संस्कृती नाही. सामान्य लोकच नाही तर नेतेही याला विरोध करत आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. जवळपास २० राज्यात याविरुद्ध आंदोलन झाले आहे. या आंदोलनात शेकडो ते हजारो लोक सहभागी झालेले दिसून आले. एकीकडे अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला असताना दुसरीकडे हे आंदोलने सुरु आहेत.
अमेरिकेत कोरोनाची साथ आटोक्यात येत नसताना आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी होत नसताना हे आंदोलक निर्बंध हटविण्याची मागणी करत आहेत. ही मागणी काही नेत्यांकडूनही केली जात आहे.
अमेरिकेतील एका सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की, बहुतांश अमेरिकी नागरिक या कडक उपायांच्या बाजूने आहेत. जणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखला जाऊ शकेल. विरोध करणाºया अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, शटडाउनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. ट्रम्प २०२० चे झेंडे, टोप्या आणि शर्टस अशा आंदोलनात सर्रास दिसत आहेत. डेमोक्रॅटिक गव्हर्नर्सच्या राज्यांमध्ये आंदोलनात हे स्पष्ट दिसत आहे.
>आंदोलनांमागे राजकारण?
हार्वर्ड युनिव्हर्सिटीत समाजशास्त्राच्या प्रोफेसर असलेल्या लेखक थेडा स्कोकपॉल यांचे असे म्हणणे आहे की, सरकारबाबत लोकांमध्ये संशय असणे साहजिक आहे. याचे प्रमाण कमी अधिकही होत राहते.
गत काही दिवसात आंदोलने वाढली आहेत. याचे पूर्ण कारण आर्थिक नाही. तर राजकीय विचारधारेतून हे होत आहे. राष्ट्रीय स्तरावर हे संघटितपणे केले जात आहे.
यामागे विशिष्ट वैचारिक ताकद आहे. मला तर असे वाटते की, आंदोलन करणाऱ्यांमध्ये सहभागी बहुतांश लोक डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत.