आॅलिम्पिकदरम्यान रिओमध्ये फ्रेंच पथकावर हल्ल्याची शक्यता
By admin | Published: July 15, 2016 02:26 AM2016-07-15T02:26:31+5:302016-07-15T12:23:19+5:30
रिओ आॅलिम्पिकदरम्यान ब्राझीलमधील इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांकडून फ्रान्स पथकातील खेळाडूंवर मोठा हल्ला करण्याची योजना तयार होत असल्याचे वृत्त आहे.
पॅरिस : रिओ आॅलिम्पिकदरम्यान ब्राझीलमधील इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांकडून फ्रान्स पथकातील खेळाडूंवर मोठा हल्ला करण्याची योजना तयार होत असल्याचे वृत्त आहे. फ्रान्सच्या गुप्तहेर एजन्सीच्या अहवालात हा दावा करण्यात आला.
फ्रान्सच्या सैन्यदलाच्या गुप्तहेर संचालनालयाचे (डीआरएम) महासचिव ख्रिस्टोफे गोमार्ट यांनी संसदीय आयोगापुढे वर्षभरातील दहशतवादी हल्ल्याची सुनावणी करतेवेळी ही माहिती दिली. गोमार्ट यांचे वक्तव्य सार्वजनिक करण्यात आले आहे.
गोमार्ट यांनी खासदारांना सांगितले की, आपल्याला गुप्तहेर सूत्रांकडून ही माहिती मिळाली. रिओत जाणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडू पथकावर ब्राझीलमधील इस्लामी मूलतत्त्ववादी जबर हल्ल्याची योजना आखत आहेत. या बाबतची सविस्तर माहिती मात्र गोमार्ट यांनी उघड केली नाही. नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्याचा तपास डीआरएम करीत आहे. या घटनेत १४७ जणांचा मृत्यू झाला होता. एजन्सीने अहवालाचा एक भाग याच आठवड्यात सार्वजनिक केला. फ्रान्सच्या प्रशासनाने देखील या दाव्याची अधिक माहिती दिलेली नाही. दुसरीकडे ब्राझीलच्या सुरक्षाविषयक कॅबिनेटने फ्रेंच प्रशासनाच्या या दाव्याची माहिती आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ब्राझील प्रशासनाने आम्ही फ्रान्सला कुठलीही माहिती पुरविलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे. ब्राझीलचे कायदामंत्री अलेक्झांड्रोव्ह मॉरिस यांनी काही दिवसांआधी आॅलिम्पिकदरम्यान रिओत जिहादी हल्ला होण्याची शंका व्यक्त केली होती हे विशेष. ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित आॅलिम्पिकसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेत ८५ हजार सुरक्षा रक्षक, ४७ हजार पोलीस आणि ३८ हजार सैनिकांचा समावेश असेल. या सुरक्षा यंत्रणेवर १० हजार ५०० खेळाडू, मोठ्या संख्येने येणारे अधिकारी आणि पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.(वृत्तसंस्था)