चंद्राच्या कलांचा पावसावर परिणाम?
By Admin | Published: February 1, 2016 02:06 AM2016-02-01T02:06:17+5:302016-02-01T02:06:17+5:30
चंद्रांच्या बदलत्या कला पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात; मात्र हा परिणाम फार कमी होतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
वॉशिंग्टन : चंद्रांच्या बदलत्या कला पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात; मात्र हा परिणाम फार कमी होतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. चंद्राच्या कला आणि पृथ्वीवर पडणारा पाऊस यांच्यात असलेल्या संबंधांची शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच माहिती झाली आहे.
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त उंचीवर असतो त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात दमटपणा निर्माण होतो. त्याचमुळे पावसाच्या प्रमाणात सूक्ष्म बदल होतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. वॉशिंग्टन विद्यापीठात या विषयावर संशोधन करणाऱ्या सुवासा सोह्यामा या विद्यार्थ्याने ही माहिती देताना सांगितले की, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण यांचा संबंध जोडणारे हे पहिलेच संशोधन आहे. संशोधकांनी यापूर्वीच्या अभ्यासात या बाबीची पुष्टी करण्यासाठी आकडेवारीच्या एका जागतिक ग्रीडचा वापर केला होता. त्यात चंद्राच्या कला जसजशा बदलतात तसतसा पृथ्वीच्या भूपृष्ठावरील वायूचा दबाव बदलतो, असे नमूद करण्यात आले होते.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पाऊस थोडा कमी पडतो, असे प्रथमच या अभ्यासात आढळून आले आहे.
हे संशोधन ‘जियोफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.