Chandrayaan-2 : हिंमत हरू नका; चीनमध्येही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:11 PM2019-09-10T12:11:41+5:302019-09-10T12:18:40+5:30
चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीनं सुरू ठेवा असं म्हटलं आहे.
इस्रोचीचांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात सोमवारी (9 सप्टेंबर) एक आनंदाची बातमी मिळाली. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं आहे अशी माहिती चांद्रयान मिशनशी संबंधित असणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली. इस्रोच्या कामगिरीचं अनेक देश कौतुक करत आहेत. चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीने सुरू ठेवा असं म्हटलं आहे.
चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या चांद्रयान- 2 मोहिमेचं भरभरून कौतुक होत आहे. चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सने एका युजरला कोट करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल तर त्याचा आम्ही सन्मान करतो. चांद्रयानाच्या अॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (ACT) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचं देखील ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.
Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीतhttps://t.co/MSwKMCc5f7#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2019
चीनच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरमध्ये 50 न्यूटनचे 8 थ्रस्टर लावण्यात आले होते. ज्यांना कंट्रोल करणं अत्यंत कठिण होतं. चीनच्या चँग-ई-3 मध्ये 28 थ्रस्टर लावण्यात आले होते. 2013 मध्ये चीनने हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सोडले होते. त्यानंतर चँग-ई-4 देखील चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सोडण्यात आले. 800 न्यूटनच्या इंजिननेही सॉफिट लँडिंग शक्य नाही. यासाठी 1 हजार 500 ते 7 हजार 500 न्यूटनच्या इंजिनची गरज असते.
Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं https://t.co/O81b2xT6e2#Chandrayaan2#ISRO
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2019
'इस्रो' चं 'नासा' कडूनही कौतुक झालं आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कौतुक करताना म्हटले की, अवकाशातील कामगिरी कठीणच असते. चांद्रयान-2 मोहिमेत ‘इस्रो’ने केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे व त्याने आम्हालाही स्फूर्ती मिळाली आहे. नासाने म्हटले की, आपण दोघे मिळून सौरमंडळाचा आणखी शोध घेण्याची संधी मिळेल, याची आम्हाला आतुरतेने प्रतिक्षा आहे.
इस्रोच्या अधिकाऱ्याने सोमवारी (9 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केलं आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.' इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.
विक्रममध्ये कोणतं तंत्रज्ञान? ते कसं काम करतं?
इस्रोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रमच्या खालील भागात पाच थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सच्या मदतीनं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार होतं. याशिवाय इस्रोच्या चारही बाजूंना थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सनी अंतराळात विक्रमला दिशा देण्याचं काम केलं. हे चारही थ्रस्टर्स अद्याप सुरक्षित आहेत. सध्या लँडरवरील कम्युनिकेशन अँटिना दबलेल्या अवस्थेत आहे. त्याही भागात थ्रस्टर्स आहेत. इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनवरुन पाठवण्यात आलेल्या सूचना ऑर्बिटरच्या माध्यमातून अँटिनापर्यंत पोहोचल्यास थ्रस्टर्स ऑन होऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहू शकेल. इस्रो यामध्ये यशस्वी ठरल्यास चांद्रयान-2 मोहिमेसंदर्भातील सर्व प्रयोग ठरल्याप्रमाणे करणं शक्य होईल. यामुळे इस्रोच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा पहिला देश होण्याचा मान यामुळे भारताला मिळेल.