सुरक्षा परिषदेच्या कामकाज पद्धतीत बदल हवेत -भारत
By admin | Published: February 17, 2016 02:58 AM2016-02-17T02:58:55+5:302016-02-17T02:58:55+5:30
संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली. १५ सदस्यांची ही सुरक्षा परिषद प्रभावशाली समजली जात असली तरी तिच्या कामकाजाच्या स्वरूपात बदल होण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले. ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या रूपात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा सन्मान व उद्देश’ विषयावरील खुल्या चर्चेत बोलत होते.
अकबरुद्दीन म्हणाले की, ‘‘सुरक्षा परिषदेचे स्वत:चे घर व्यवस्थित नाही तरीही ती जगाच्या वेगवेगळ्या भागात लोकशाही आणि कायद्याच्या राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करीत आहे, ही मोठी विसंगती आहे.’’ सुरक्षा परिषदेचे सध्याचे स्वरूप आणि कामकाजाची पद्धत वास्तवापासून दूर असून ती निघून गेलेल्या काळाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ही परिषद कालसुसंगत असण्यासाठी तिच्यामध्ये सुधारणांशिवाय काही पर्याय नाही, असेही ते म्हणाले. परिषदेमध्ये सुधारणा घडविण्यासाठी तिला प्रलयकारी संकटाची वाट बघायची गरज नाही, असेही अकबरुद्दीन म्हणाले. (वृत्तसंस्था)