बोईंगमधील अफरातफरी चव्हाट्यावर आणलेली; माजी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:41 AM2024-03-12T09:41:59+5:302024-03-12T09:42:26+5:30
बार्नेट यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
बोईंगचे माजी कर्मचारी आणि कंपनीतील कथित अफारतफरी बाहेर काढणाऱ्या जॉन बार्नेट यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. बार्नेट यांनी ३२ वर्षे बोईंगमध्ये नोकरी केली होती. २०१७ मध्ये ते निवृत्त झाले होते. बार्नेट यांना व्हिसलब्लोअर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी बोईंगमधील मोठे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले होते.
बार्नेट यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. बार्नेट हे बोईंगमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे ७८७ ड्रीमलायनर या विमानाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. २०१९ मध्ये बार्नेट यांनी बोईंगवर गंभीर आरोप केला होता. यामुळे खळबळ उडाली होती.
कंपनीचे कर्मचारी दबावाखाली येऊन कमी दर्जाची उपकरणे विमानांमध्ये वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच विमानातील ऑक्सिजन सिस्टीममध्ये गंभीर समस्या असल्याचा दावाही त्यांनी केला होता. कंपनीने बार्नेट यांचे दावे फेटाळून लावले होते. परंतु बार्नेट यांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करत आपला जबाबही नोंदविला होता.
मीडिया रिपोर्टनुसार बार्नेट यांचा मृतदेह ९ मार्चच्या रात्री त्यांच्या पिकअप ट्रकमध्ये सापडला होता. बार्नेट यांनी स्वत:च वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. विमानाच्या असेम्ब्ली प्रक्रियेत गुणवत्तेशी छेडछाड करण्य़ात आल्याचा त्यांचा आरोप होता. २०१७ मध्ये अमेरिकेच्या संघीय एव्हिएशन एडमिनीस्ट्रेशनने देखील बोईंगवरील अशाप्रकारच्या आरोपांवर चौकशी केली होती. निवृत्तीनंतर बार्नेट यांनी बोईंगची पोलखोल करत गुन्हाही दाखल केला होता.